दिगंबर शिंदे

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महाराजांना उमेदवारी देऊ केली होती, पण जात प्रमाणपत्रामुळे अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्याच महाराजांच्या हस्ते भाजपच्या उमेदवाराने प्रचाराचा नारळ वाढविला. महाराजांची ताकद लक्षात घेऊनच बहुधा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराने याच महाराजांच्या हस्ते शनिवारी प्रचाराला सुरुवात केली. महाराजांनी ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ या ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील वचनानुसार सत्ताधारीबरोबरच विरोधकांनाही आशीर्वाद दिले आहेत.

धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीचा राजकीय कारणासाठी वापर करण्याचा प्रकार भाजपबरोबर काँग्रेस महाआघाडीने केल्याचा प्रकार मिरज मतदारसंघात समोर आला. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार म्हणून महाआघाडीने बेळंकीचे महाराज शिवलिं ग शिवाचार्य यांच्या नावाची घोषणा केली खरी, पण आरक्षित जागेसाठी जातीचे प्रमाणपत्र मिळाले नाही. यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. भाजपने यावर कडी करीत याच महाराजांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करीत महाआघाडीला शह दिला. तर स्वाभिमानीने शनिवारी याच महाराजांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करीत भाजपला काटशह देण्याचा प्रयत्न केला. भाजप आणि स्वाभिमानी या दोन्ही विरोधातील उमेदवारांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आहे.

मिरज राखीव मतदारसंघामध्ये मंत्री खाडे यांच्या विरुद्ध मदानात उतरण्यासाठी सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरू होती. स्वाभिमानीला ही जागा मिळताच बेळंकी येथील मठाचे स्वामी शिविलग शिवाचार्य हे स्वाभिमानीचे उमेदवार असतील अशी घोषणाही राजू शेट्टी यांनी केली होती. मात्र ऐनवेळी जात प्रमाणपत्राची उपलब्धता होत नाही असे कारण सांगून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यापूर्वी महाराजांनी आपली तलवार म्यान केली.

मात्र विरोधकांच्या या प्रयत्नाला शह देण्यासाठी भाजपने बेळंकी येथे महाराजांच्या हस्तेच प्रचार शुभारंभ करून महाआघाडीला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान, महाआघाडीतील कार्यकर्त्यांनी महाराजांशी संपर्क साधून प्रचाराचा नारळ वाढविण्याची विनंती केली. या विनंतीस मान देत शनिवारी याच महाराजांच्या हस्ते महाआघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.