शरद पवार यांची मोदींवर टीका

अकोला : लोकसभा निवडणुकीचा अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागला, याचे कारण नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेचा मुद्दा प्रचारात आणला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंक ले तरी त्याचे श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. यापूर्वी मतासाठी कोणीही संरक्षण खात्याचा वापर केला नाही. नरेंद्र मोदी मात्र सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडले.

अकोला जिल्हय़ातील वाडेगाव येथे बाळापूर मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पवार म्हणाले की, पुलवामासारख्या घटनेवर कारवाईसाठी लष्कर, हवाईदल असताना हे ‘घुस के मारेंगे’ची भाषा करतात. दिल्लीत बसून हे कसे काय घुसून मारणार? असा सवाल करत त्यांनी मोदींची खिल्ली उडविली. देशापुढील मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जात नाही. सरकारला शेतकऱ्यांप्रति कोणतीही आस्था नाही. ६५ टक्के लोक शेती करतात. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, त्यासाठी सरकार काहीच करत नाही. आम्ही ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. शून्य टक्केव्याजाने कर्ज दिले. मुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षात असताना सत्तेवर आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ, असे म्हणत होते. आता पाच वर्षांपासून सत्तेत असल्यावर भावाच्या नावाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन या सरकारने दिले. आजही ६१ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला.

उद्योगधंदे वाढण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाही. आमच्या काळात अनेक कारखाने उभे केले होते. आता ते सर्व बंद पडत आहेत. हजारो लोक बेरोजगार झाले. हाताला काम नसल्याने बेकारीचे चित्र निर्माण झाले. शेती, उद्योग, नोकऱ्या आदींसह सर्वच क्षेत्रांवर संकट दिसत आहे. मग हे सरकार कोणासाठी सत्ता चालवीत आहे, असा खडा सवाल पवार यांनी केला.

‘अभी तो मैं जवान हू

वाढत्या वयातही शरद पवारांवर प्रचाराची धुरा सांभाळण्याची वेळ आली, असे विरोधकांकडून नेहमीच बोलले जाते. त्याचा जोरदार समाचार घेत, ‘अभी तो मैं जवान हूँ’ अशा शब्दांत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले.