सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील ४६ पैकी १९ मतदारसंघांतील राजकारण नातेवाईकांनी व्यापले आहे. निवडणुकीच्या रिंगणात काका-पुतण्याची संख्या लक्षणीय आहे. भाऊ, बहीण-भाऊ, काका-पुतणे अशी नाती तर आहेतच.

लातूर शहरातून आमदार अमित देशमुख उतरणार हे नक्की होते. औसा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय साहाय्यक राहिलेले अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला गेली. या मतदारसंघातून काँग्रेसने धीरज देशमुख यांना रिंगणात उतरविले. त्यामुळे दोन सख्खे भाऊ लगतच्या मतदारसंघात निवडणूक लढवीत आहेत. परळीमधील नेहमीची लक्षवेधी लढत मुंडे बहीण-भावामध्ये रंगते आहे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आणि या मतदारसंघातील निवडणूक संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदासंघाचे नेतृत्व पूर्वी हेमंत पाटील करीत होते.

४१ वर्षांनंतर भोकर मतदारसंघातही परंपरेने राजकीय वारसा असणारे प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. शंकरराव चव्हाण आणि बाबासाहेब गोरठेकर यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढविली होती. आता शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोकराव यांच्या विरोधात बाबासाहेब गोरठेकरांचे सुपुत्र बापूसाहेब गोरठेकर असा सामना आहे. लोहा-कंधारमधून डाव्या चळवळीचा झेंडा उंचावत ठेवणारे अलीकडेच वयाची शंभरी पूर्ण करणारे केशवराव धोंडगे यांचा मुलगा मुक्तेश्वर धोंडगे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या मुलास म्हणजे दिलिप यांना उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.

बीडमध्ये चुरशीची लढत

* काका-पुतण्यांचे राजकारण महाराष्ट्रात नवे नाही. या वेळी जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हा संघर्षही बीड जिल्हय़ात चर्चेचा विषय आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या मुलासाठी भोकरदन मतदारसंघ सुरक्षित करून घेतला.

* या वेळी संतोष दानवे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत. रावसाहेबांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनीही कन्नड मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राजकीय आघाडीवर सासरे-जावई एकमेकांचे ऐकत नाहीत, असा दावा केला जात असला तरी रावसाहेब जावयास मदत करतात, असे सांगणारे औरंगाबाद जिल्हय़ात अनेक जण आहेत. या शिवाय बदामराव पंडित व विजयसिंह पंडित अशी गेवराई मतदारसंघातील काका-पुतण्याची लढतही लक्षवेधी ठरेल, असे मानले जाते.

* मतदारसंघात राजकीय असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले राणाजगजीतसिंह यांचे राजकारणच डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय वारशातून सुरू झाले. ते आता तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.

* निलंगा मतदारसंघात नेहमीच निलंगेकर घराण्यात निवडणूक होते. या वेळी मंत्री संभाजी पाटील यांच्यासमोर त्यांचे काका अशोक पाटील निलंगेकर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उभे आहेत. आजोबा-नातू ते काका-पुतण्या अशी लढत या वेळी होत आहे.

* गंगाखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविणारे मधुसूदन केंद्रे हे धनंजय मुंडे यांचे नातेवाईक आहेत. केज मतदारसंघातून विमल मुंदडा यांच्या पश्चात त्यांच्या स्नुषा नमिता मुंदडा यांना भाजपने उमेदवारी दिली.

* माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे सुपुत्र रमेश आडसकर, माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे सुपुत्र प्रकाश सोळंके, महारुद्र मोटे यांचे चिरंजीव राहुल मोटे, अंकुशराव टोपे यांचे चिरंजीव राजेश टोपे हे या वेळी निवडणुकीच्या मैदानात आहेत.