मायावती यांची शनिवारी नगरला सभा

नगर शहर मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार श्रीपाद छिंदम यांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे. प्रतिस्पर्धी शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर त्यांना सशस्त्र अंगरक्षक देण्यात आला आहे. त्यामुळे छिंदम यांचा पोलीस संरक्षणात प्रचार सुरु झाला आहे. दरम्यान छिंदम यांच्या प्रचारासाठी शनिवारी (दि. १९) पक्षाच्या अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मायावती यांची शहरात प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. मायावती यांची यापूर्वी सन २००४ मध्ये नगरमध्ये सभा झाली होती.

उमेदवार छिंदम, पक्षाचे प्रचारक बृहद्रथ सूर्यवंशी यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उमाशंकर यादव, राजू शिंदे, संजय डहाणे, नितीनचंद्र भालेराव आदी उपस्थित होते. जिल्ह्य़ातील राहुरी व अकोले वगळता सर्व मतदारसंघात पक्षचिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. पक्षाने नगर शहर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. महापौर निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या सांगण्यावरुन मनपा सभागृहात त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेली मारहाण, राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरुन १६ फेब्रुवारी २०१८ च्या घटनेचा आधार घेत त्यांच्या समर्थकांनी आपल्या घराची, गाडीची केलेली तोडफोड, जगताप यांनी आपल्याला पकडून देण्यासाठी जाहीर केलेले अकरा लाखांचे बक्षीस, उमेदवारी दाखल केल्यानंतर आपल्याला येत असलेल्या धमक्या यामुळे आपण पोलिसांकडे अंगरक्षकाची मागणी केल्याचे छिंदम यांनी सांगितले.

शहरातील बसपाचे चारही नगरसेवक पक्षाबरोबर पर्यायाने आपल्या प्रचारात असल्याचा दावा छिंदम यांनी केला. उमाशंकर यादव यांनीही नगरसेवकांशी चर्चा केल्याचे सांगितले.