कमी वेळेत जास्त मतदारांशी संपर्काचे उमेदवारांपुढे आव्हान

अंधांतरी असलेली महायुती, उमेदवारी मिळण्याची नसलेली शाश्वती, पिृतपक्ष, नवरात्रोत्सव यामुळे मतदानासाठी केवळ आता १२ दिवसांचा कालावधी राहिल्याने कमी काळात जास्त मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न नवी मुंबईतील २८ उमेदवार करणार आहेत. यात बेलापूर मतदारसंघातील भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्ट्रवादीचे अशोक गावडे, आणि मनसेचे गजानन काळे, अपक्ष विजय माने यांचा कस लागणार आहे, तर ऐरोलीतील भाजपचे गणेश नाईक, राष्ट्रवादीचे गणेश शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने नाईक म्हात्रे यांनी अनेक मंडळाशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला. बोनकोडे या जन्मगावातून नाईक बुधवारपासून खऱ्या अर्थाने मतदारांशी संपर्क साधणार आहेत. यात समाजमाध्यमांचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे.

माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या  लढतीतील हवा निघून गेली. त्यात राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्याने उमेदवार संख्या कमी झाली. ऐरोली मतदारसंघात तर नाईकांचे पुत्र संदीप यांनी माघार घेऊन वडिलांना प्राधान्य दिले आहे. मागील काही निवडणुकीत नाईकांच्या विरोधात उभे ठाकणारे त्यांचे प्रतिस्पर्धी माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे या निवडणुकीच्या निमित्ताने वैर संपले असून आता नाईकांच्या विजयासाठी चौगुले प्रचार करणार आहेत. गेल्या वर्षी संदीप नाईक यांच्या विरोधात ऐनवेळी भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरणारा त्यांचा चुलत भाऊ आणि नाईकांचा पुतण्या माजी महापौर तुकाराम नाईक यांचा मुलगा वैभव नाईक यांनेही नाईकांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे कधीकाळी नाईकांच्या विरोधात असलेले उमेदवार आज नाईकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी आता केवळ दहा ते बारा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. या काळात ‘रोड शो’ करून मतदारांशी संर्पक साधला जाणार आहे. भाजपाची मतदार संर्पकाची एक पध्दत आहे. मतदार यादीतील एका कागदावर असलेल्या मतदार संख्येशी एकाच कार्यकर्त्यांने संर्पक साधण्याचे आदेश आहेत. त्या पन्ना कार्यकर्त्यांने इतर मतदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही तयारी एक महिना अखेर पूर्वीच करण्यात आली आहे. राज्यात युती न झाल्यास सर्व जागा लढण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी ऐरोलीतून विजय चौगुले, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तयारी सुरू केली होती. ही तयारी आता नाईकांसाठी कामी येणार आहे. भाजपा सारख्या नियोजन बध्द पक्षात काम करण्याची नाईक कुटुंबाची ही पहिलीच वेळ आहे. गेली पन्नास वर्षे दोन प्रादेशिक पक्षात काम करणाऱ्या नाईकांना या राष्ट्रीय पक्षाने प्रचाराची आखणी करुन दिली आहे. त्याशिवाय नाईक यांनी स्वत:ची यंत्रणा राबविताना नवरात्रोत्सवानंतर ५२ प्रभागात पायी फिरण्याची तयारी सुरु केली आहे. म्हात्रे यांनी बेलापूर मतदार संघासाठी पक्षाने आखून दिलेल्या आराखडय़ानुसार कामास सुरुवात केली आहे. आमदार रमेश पाटील यांचे सुपूत्र अ‍ॅड चेतन पाटील यांना या मतदार संघाची धुरा देण्यात आली आहे तर ऐरोलीसाठी चित्रपट सेन्सॉर बोर्डचे सदस्य आणि पक्षाचे पदाधिकारी विजय घाटे यांना संर्पक प्रमुख नेमण्यात आले आहे. याशिवाय राज्य पातळीवरील निरीक्षक या दोन्ही मतदार संघात तळ ठोकून आहेत. या दोन्ही मतदार संघात अनुक्रमे ११ व १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ते आगामी २ दिवसांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. यात त्यांना समाज माध्यमांची साथ मोलाची ठरणार आहे.

जानेवारीतले हळदीकुंकू ऑक्टोबरमध्ये!

मतदारांशी संर्पक साधण्याच्या अनेक क्लृप्त्या आखल्या गेल्या आहेत. सर्वसाधारपणे जानेवारी महिन्यात होणारा हळदी कुंकू कार्यक्रम यावेळी नवरात्रोत्सवात काही मंडळाने आयोजित केला होता. त्यामागे निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार होते हे स्पष्ट दिसून येत आहे. या हळदी कुंकू कार्यक्रमात प्रेशर कूकरपासून ते इस्त्रीपर्यंत वस्तू भेट म्हणून देण्यात आलेल्या आहेत.