ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लीलाताई चितळे यांचे आवाहन; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

धर्माधिष्ठित, तत्त्वज्ञानावर आधारित शासन असलेल्या देशात स्त्रीला सदैव दुय्यम स्थान दिले गेले. स्त्री ही भोगवस्तू आहे, हेच समाजाचे मत होते. देशातील आजच्या परिस्थितीतही काही घटक महिलांसाठी विशेष अनुकूल नाही. स्त्रियांच्या या स्थितीला काही प्रमाणात स्त्रिया देखील जबाबदार आहेत, असे परखड व स्पष्ट मत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लीलाताई चितळे यांनी लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीत मांडले. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुका असोत किंवा आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका, या दोन्हीत स्त्रियांना दिल्या गेलेल्या उमेदवारीचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्या पाश्र्वभूमीवर लीलाताई चितळे यांनी स्वातंत्र्यपूर्व तर स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीपट उलगडतानाच स्त्रीला उमेदवारी का नाकारली जाते, याबाबत आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.

समाज हा स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही खांद्यावर वाटचाल करतो. तरीही स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले जात नाही, हे वास्तव आहे. मानवाने समाज निर्माण केला तेव्हापासून एक नैसर्गिक आणि दुसरी मानवाने निर्माण केलेली समाज नावाची चौकट आहे. नैसर्गिक चौकटीत मानवाने लुडबूड केल्याशिवाय बिघाड होत नाही. मानवी चौकटीत मात्र विविधता आहे. सामाजिक अवस्थेत निसर्गाने तिला दुबळेपणाचा शाप दिला आहे, त्याचा फायदा समाजात पुरुषवर्ग घेतो. ही मानसिकता केवळ मानवी व्यवस्थेनेच निर्माण केली नाही तर निसर्गानेही निर्माण केली आहे. स्त्री एखादे पाऊल मागे घेत असेल तर ती दुबळी आहे असे नाही, तर पुरुषापेक्षा ती शहाणी आहे. स्त्रियांनी आत्मप्रतिष्ठेचा विस्तार आणि प्रसार करायचा आहे. शासन व्यवस्था ही पुरुषांच्या कर्तृत्वावर चालत नाही तर कुटुंब आणि व्यक्तीपासून त्याची सुरुवात होते. सैन्यात स्त्री प्रमुख पदावर आहे. स्त्री पायलट आहे. या पदावर ती पोहोचली म्हणजे निर्णयप्रक्रियेत तिला सामावून घेतले जाते का, हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात स्त्रीला राणी म्हणून संबोधतात आणि निर्णय घेण्यापासून तिला वंचित केले जाते. स्त्रीला ज्ञान नाही असे वाटत असेल तर पुरुषांनाही ते नसते. मी कसे दिसावे हे त्या स्वत:साठी नाही इतरांसाठी विचार करतात. ज्या दिवशी त्या स्वत:साठी तयार होतील, त्यादिवशी त्या खंबीर होतील. स्त्री-पुरुष समानतेची मानसिकताच अजून तयार नाही. ही मानसिकता तयार करावी लागेल. स्त्रियांना अजूनही संधी आहे. या संधीचा फायदा त्या घेतील, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या समोर जातील.

उमेदवारी मिळाली नाही म्हणून शांत बसण्यापेक्षा, ही उमेदवारी कशी मिळवून घेता येईल. आपला हक्क कसा मिळवून घेता येईल, हे स्त्रियांना शिकावेच लागेल. नाही तर या मोजक्या संधी देखील त्यांना गमवाव्या लागतील, असेही लीलाताई चितळे म्हणाल्या.