मोजक्याच लोकांकडून जाहिरात

चंद्रशेखर बोबडे, नागपूर</strong>

निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी त्यांच्यावरील गुन्ह्य़ांची माहिती मतदारांना कळावी म्हणून ती वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी, असे निर्देश आयोगाने दिल्यावरही विधानसभेचे मतदान तोंडावर आले असतानाही अद्याप राज्यातील बहुतांश उमेदवारांनी ही माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली नाही.

निवडणूक रिंगणातील उमेदवारांवरील गुन्ह्य़ांबाबतची माहिती सार्वजनिक करावी, असे आदेश २५ ऑक्टोबर २०१८ला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आयोगाने २८ सप्टेंबर २०१९ला परिपत्रक जारी केले. त्यानुसार उमेदवारावर गुन्हेगारी व फौजदारी प्रकरण असल्यास मतदानाच्या दोन दिवस आधी किमान तीन वेळा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरून जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी नमुनाही आयोगाने ठरवून दिला आहे. याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही द्यायची आहे. ती न दिल्यास आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उमेदवारावर कारवाई केली जाऊ  शकते.

यासंदर्भात माहिती घेतली असता नागपूरसह राज्यातील बहुतांश उमेदवारांनी अद्याप अशा प्रकारच्या जाहिराती वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल्सवर प्रसिद्धच केल्या नाहीत. नागपूर जिल्ह्य़ात १२ मतदारसंघ आहेत. त्यात १४६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. यासंदर्भात निवडणूक शाखेकडे विचारणा केली असता त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे सांगितले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी खर्च निरीक्षकांशी बोला असे सांगितले. एकत्रित माहिती कोणाकडेही नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आढावा घेणार असल्याचे सांगितले.

नागपूर जिल्ह्य़ात एकूण १४६ उमेदवार आहेत. त्यापैकी फक्त मोजक्याच उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केल्याची माहिती आहे. वरोरा मतदारसंघातील स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार आणि माजी आमदार वामनराव चटप यांनी त्यांच्यावरील गुन्ह्य़ांची माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे.

प्रत्येक उमेदवाराला त्याच्यावरील गुन्ह्य़ांविषयीची माहिती वर्तमानपत्रात जाहिरात देऊन प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. याबाबत आढावा घेतला जाईल. ज्यांनी ती प्रसिद्ध केली नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

– रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी, नागपूर