गृहमंत्री अमित शहा यांची टीका

केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा  देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याने त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे, पण काँग्रेसच्या मात्र पोटात दुखत आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. यावेळी त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीच्या पत्नीसोबत राष्ट्रवादीच्या नेत्याचे व्यावसायिक संबंध असल्याचा आरोपही केला.

शहा यांची आज सावनेर आणि कामठी या दोन मतदारसंघाला जोडणाऱ्या खापरखेडा येथे रात्री ७ वाजता प्रचार सभा झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. शहा यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका करीत काँग्रेसने जे काम पन्नास वर्षांत केले नाही ते आम्ही पाच वर्षांत केले असे सांगून विकास कामांवर जाहीर चर्चेचे आव्हान त्यांनी काँग्रेसला दिले. काश्मीरला ३७० कलम लागू करून विशेष दर्जा देण्याचा निर्णय काँग्रेसचाच होता. इतके वर्ष त्यांनीच ते कायम ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ते रद्द केले. मात्र काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. त्यांनी या मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही अतिरेक्यांना धडा शिकवला मात्र राहुल गांधी यांनी या कारवाईचे पुरावे मागितले. हीच भाषा पाकिस्तानही करीत होता. राहुल गांधीही हीच भाषा करीत आहेत. वीर सावरकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले होते. मात्र काँग्रेस त्यांच्याबाबत अपप्रचार करीत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावरही आरोप केले. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीच्या पत्नीसोबत  व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करीत ईडी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.अमित शहा यांनी बावनकुळे यांचा भाजप के बडे नेता असा उल्लेख के ला तर बावनकुळे यांनीही अमित शहा यांचा उल्लेख हमारे बडे भाई असा केला.