मतदानावेळी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर करणे योग्य नाही, ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे. मतदारांनी उपलब्ध उमेदवारांपैकी जो चांगला उमेदवार आहे त्याला मतदान करावे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकातदादा पुण्यातील कोथरूड मतदार संघातून विधानसभा लढवत आहेत. मात्र ते या मतदारसंघातील नसल्याने त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्थानिकांच्या नाराजीचा काहीप्रमाणात सामना करावा लागत आहे. अशावेळी मतदारांकडून मतदान करतेवेळी ‘नोटा’ या पर्यायाचा वापर देखील होण्याची शक्यता असल्याने, चंद्रकांतदादांनी ‘नोटा’ बद्दल केलेल्या विधानाला महत्त्व आहे.

चंद्रकांतदादा यांनी म्हटले आहे की. ‘नोटा’ चा वापर करणे ही गोष्ट लोकशाहीमध्ये योग्य नाही. डावं – उजवं असू शकतं. एक कोणीतरी उमेदवार आवडत नसेल, तर मग असलेल्या उमेदवारांपैकी बरा उमेदवार जो आहे त्याला मतदान करावे. उपलब्ध असणाऱ्यांपैकी चांगला असलेल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपण बाहेर पडलं पाहिजे, त्याला मतदान केलं पाहिजे. ‘नोटा’ हे लोकशाहीला घातक आहे. झी चोवीस तासशी बोलताना चंद्रकांतदादांनी  मत व्यक्त केले.

विशेष म्हणजे कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याविरोधात नोटा वापरण्याची देखील मोहीम राबवण्यात आली होती. तसेच बॅनरबाजी करत बाहेरचा उमेदवार नको घरचाच हवा, अशी देखील मतदारांकडून मागणी करण्यात आली होती.