चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी महायुतीला समर्थन जाहीर केले आहे. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन फडणवीसांच्या नेतृत्त्वातील सरकारला माझा बिनशर्त पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. भाजपाविरोधात मिळालेल्या विक्रमी एक लाख १७ हजार मतदारांच्या जनादेशाचा अपमान करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, असंतुष्ट भाजप व शिवसैनिक तथा सामान्य जनतेच्या मदतीच्या बळावर विजयी झालेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचे जाहीर करताच, त्याचा परिणाम समाज माध्यमावर दिसला आणि मतदारांनी जोरगेवारांवर अक्षरश: शिव्यांची लाखोळी वाहिली. दरम्यान, जनमत विरोधात जात असल्याचे बघून समर्थकांची बैठक बोलावून भाजपासोबतच इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. पण विकासासाठी मुख्यमंत्र्यांसोबत राहील, अशी भूमिका जोरगेवार यांनी घेतली आहे. आतापर्यंत एकूण 9 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजपाचं संख्याबळ 105 वरुन 114 जागांवर पोहोचलं आहे. जोरगेवार यांनी चंद्रपुरातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्यांनी भाजपाचेच उमेदवार नानाजी सीतारामजी शामकुळे यांचा पराभव केला होता.

भाजपा व शिवसेनेच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच सोमवारी अपक्ष आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र फडणवीस यांच्या कार्यालयाने समाज माध्यमावर सार्वजनिक केले. त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असा स्पष्ट उल्लेख होता. त्याचा परिणाम जोरगेवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. समाज माध्यमांवर जोरगेवार यांची खिल्ली उडवतानाच हा जनाधार भाजपाविरोधी होता. आता जोरगेवारच भाजपात प्रवेश करीत असेल मतदारांचा अपमान आहे, अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका सुरू झाली. जोरगेवार यांना निवडणूक काळात सर्व प्रकारची मदत करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, असंतुष्ट भाजपा आणि शिवसैनिकांनी तर खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली.

दरम्यान, हा सर्व प्रकार अंगलट येत आहे आणि यात चंद्रपूरची जनता विरोधात जात असल्याचे बघून जोरगेवार यांनी अचानक कूस बदलत रात्रीच नागपुरात काँग्रेसचे नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधत आपण फक्त चंद्रपूरकरांचे उमेदवार असून कोणत्याही पक्षात गेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी जोरगेवार म्हणाले, एका अपक्ष उमेदवाराला ऐतिहासिक मताधिक्य चंद्रपूरकरांनी दिले आहे. त्यामुळे माझ्याही जबाबदाऱ्या वाढल्या आहे. पुढच्या पाच वर्षांत मी केलेल्या कामांचा अहवाल घेऊन मला मतदारांपुढे यायचे आहे. निवडणुकी दरम्यान मी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द मला आठवण आहे. मी काहीही विसरलो नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते याप्रसंगी बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावलं, मी त्यांच्या विनंतीला मान देत त्यांची भेट घेतली. यावेळी मी कोणताही पक्ष प्रवेश केलेला नाही. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.