ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं असं मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. पुरोगामी महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लागणं दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती राजवट सहा महिने लागू राहणं चांगली गोष्ट नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी संभाजीराजे यांनी ट्विट करत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागतं हे अतिशय चिंताजनक आहे असं म्हटलं होतं.

छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, “आपलं महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला एक दिशा दिली आहे. आपल्याकडे शिवाजी महाराज, शाहू, फुले यांच्यासारखे महापुरुष निर्माण झाले. अनेक संत आपल्या महाराष्ट्राने दिले आहेत. अशा ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू होणं दुर्देवी आहे”.

“सरकार स्थापनेसाठी पहिलं प्राधान्य शिवसेना भाजपाला दिलं पाहिजे. लोकांनी त्यांना बहुमत दिलं आहे. त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं. ते होत नसेल तर इतर कोणीही करा पण लवकराच लवकर सरकार स्थापन करा,” असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रपती राजवटीत घेऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

“सर्व राजकीय पक्षांनी आपली परिपक्वता दाखवावी अशी विनंती आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं,” असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

याआधी छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटातून जातोय, अनेक कारणांमुळे युवक नैराश्यात आहेत. अनेक प्रश्न राज्यसमोर आवासून उभे असताना, ही राजकीय अस्थिरता परवडणारी नाही. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढावा व स्थिर सरकार स्थापन करुन लोकाभिमुख राज्यकारभार करावा”.