News Flash

‘गाव तिथे बिअर बार’ योजनेचे आश्वासन देणाऱ्या महिला उमेदवाराला मिळालेलं जनमत पाहून थक्क व्हाल

"जनता चोरून, दुप्पट-तिप्पट भावाने दारू पिते तेव्हा फार दु:ख होते," असं त्या प्रचारात म्हणाल्या होत्या.

वनिता जितेंद्र राऊत

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. भाजपाने १०३ जागांवर, शिवसेनेने ५६ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ तर काँग्रेसने ५० जागेवर विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीमध्ये १३ अपक्ष आणि अन्य पक्षातील उमेदवार अमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वांनीच महिनाभर दमदार प्रचार केला. अनेकांनी आश्वासने, वचननाम्यांच्या माध्यमातून मतदारराजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेले आश्वासन म्हणजे चिमूरमधील अपक्ष उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांनी दिलेले आश्वासन.

‘आमदार म्हणून निवडून आल्यास दारूबंदी हटवून बेरोजगारांना दारू विक्रीचे परवाने देणार, गाव तिथे बिअर बार योजना राबवणार, बारमध्ये व्हिस्की, बिअर सवलतीत देणार अशी अफलातून आश्वासने राऊत यांनी दिली होती. आपल्या प्रचारात दारूबंदी हटावची मागणी त्यांनी केली होती. मात्र आता निवडणुकीनंतर या ‘गाव तिथे बिअर बार योजना’ राबवणाऱ्या बाईंचे काय झाले?, त्या निवडून आल्या की नाही? असे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. तर या प्रश्नांचे उत्तर द्यायचे झाल्यास नाही असे उत्तर द्यावे लागेल. चिमूरमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विनाता यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यांना केवळ २८६ मतं मिळाली आहेत. त्यामुळेच त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. चिमूरमधून भाजपाचे बंटी भांगडिया दहा हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. बंटी यांना ८७ हजार १४६ मते मिळाली असून दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांना ७७ हजार मते मिळाली आहेत.

असा केला होता युक्तीवाद

चंद्रपूर जिल्हय़ात एप्रिल २०१५ पासून दारूबंदी आहे. या पाश्र्वभूमीवर वनिता राऊत यांच्या आश्वासनाने लक्ष वेधून घेतले होते. दारूबंदी समर्थनार्थ अजब युक्तिवाद करताना राऊत यांनी, “नागरिकांना दारू पिण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त झाला पाहिजे. काही भागात मद्यप्राशन सामाजिक प्रथा असून लोकांना चोरून दारू पिण्यास व विकण्यास भाग पाडण्याशिवाय दारूबंदीने  काहीही साध्य झालेले नाही. जनता चोरून, दुप्पट-तिप्पट भावाने दारू पिते तेव्हा फार दु:ख होते. कुटुंबातील सर्वानी मिळून दारू पिल्यास घरात वाद, भांडणे होणार नाहीत,” असे मत व्यक्त केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:09 pm

Web Title: chimur independent candidate vanita raut who promise beer bar in village lost the election scsg 91
Next Stories
1 काँग्रेसने ‘सुपर ६०’ प्रोजेक्टमुळे जिंकल्या २८ जागा
2 पिकांच्या नुकसानाचे युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या : धनंजय मुंडे
3 पुष्पक एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरला
Just Now!
X