संतोष सावंत

राज्यातील सर्वाधिक मतदार असणाऱ्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर, कामोठे, रोडपाली व तळोजा या वसाहतींमधील ४० विविध गृहनिर्माण सोसायटय़ांमधील उच्चशिक्षित सदस्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि  पक्षांविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘यापैकी कुणीही नाही ’ म्हणजेच ‘नोटा’च्या पर्यायासाठी मोहीम सुरू केली आहे. अनेक सोसायटय़ांनी थेट प्रवेशद्वारावर ठळकपणे ‘पाणी नाही तर मतदान नाही’, ‘विकास नाही तर मतदान नाही’ असे फलक झळकवले आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघात ५ लाख ५७ हजार ३२४ मतदारांची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ अशी ओळख पनवेलची झाली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात जुने पनवेल शहर आणि   खारघर, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल, रोडपाली, कामोठे या सिडको वसाहतींचा नागरी लोकवस्तीचा परिसर येतो. सध्या कामोठे, रोडपाली, खारघर व तळोजा येथे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात. नागरिक सिडको मंडळ व पनवेल पालिकेकडे तक्रारी करून वैतागले आहेत. त्यामुळेच नोटा पर्याय वापरण्याच्या या मोहिमेला सुरुवात केली आहे.

अनेक ठिकाणी फलक : खारघर सेक्टर ३४ येथील सुमारे ६०० मतदारांनी ‘पाणी द्या अन्यथा मतदान करणार नाही’ असा निर्धार केला आहे. सेक्टर ३४ येथील ४० पैकी १४ सोसायटय़ांनी याबाबतचा फलक  लावला आहे. सुरुवातीला ही मोहीम तळोजा वसाहतीमधील काही सोसायटय़ांनी राबविली. त्यानंतर ही मोहिम आता खारघर व पुढे रोडपाली, शनिवारपासून कामोठे येथे सुरू करण्यात आली.

आम्ही महिन्याभरापासून या मोहिमेसाठी नागरिकांशी संवाद साधत आहोत. तीन वर्षांपासून पाणीसंकटाचा सामना करून राहत आहोत. लाखो रुपये खर्च करून सदनिका खरेदी केल्या.  मोठय़ा शहराची पाण्याविना दशा झाली आहे.नागरिक  बहिष्कारावर ठाम आहेत. अजूनही सोसायच्या आम्हाला पाठिंबा देत आहेत.

– संदीप खाकसे, सेक्टर ३४ असोसिएशन

आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात ही मोहीम सुरू केली नाही. आम्ही अनेक महिने सिडको आणि सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाणी, प्रदूषण व रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल पाठपुरावा केला आहे. आम्हाला नेहमी आश्वासन मिळाले आहे. पाण्यासारखी मूलभूत गरजही अद्याप पूर्ण झालेली नाही. .

– मंगल कांबळे, स्वच्छ कर्म फाऊंडेशन