“राष्ट्रवाद हा आमचा एकमेव अजेंडा नसून, अजेंड्याचा एक भाग आहे. ३७० हा जम्मू काश्मीर नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा असून ३७० आणि राष्ट्रवाद आमचा अजेंडा असल्याचा अभिमान आहे,” असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. “राष्ट्रवादावर बोलण्यासाठी आपण घाबरण्याची काय गरज आहे. आम्ही त्यावर नेहमी बोलत राहणार,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले.

नारायण राणे आणि युतीबद्दल येत्या काही दिवसांत निर्णय
“तुमच्याप्रमाणे मलाही युतीची चिंता असून योग्य वेळी योग्य निर्णय घोषित करु,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावरही लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं.

आरेऐवजी पर्यायी जागा निवडल्यास मुंबईकरांवर अतिरिक्त भार
“आरे कारशेडला विरोध करत काहीजण आपले मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. आरेसंबंधी काही लोकांची चिंता समजू शकतो. पण जेव्हा पर्यायी जागा आहे सांगितलं जातं तेव्हा अतिरिक्त पैसे खर्च करुन ती घ्यावी लागेल हे महत्त्वाचं आहे. एक रुपया जरी जास्त खर्च केला तर त्याचा परिणाम तिकीटाच्या दरावर आणि मुंबईकरांवर होईल,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

कॉर्पोरेट टॅक्सच्या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार
“कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याच्या निर्णयाचा महाराष्ट्राला फायदा होणार असून गुंतवणूक वाढण्यास मदत मिळेल,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कॉर्पोरेट टॅक्स २२ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय हा खूप धाडसी असल्याचं कौतुकही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. “जागतिक स्पर्धेत आपण मागे पडत असल्याची अनेक उद्योजकांची तक्रार होती. कॉर्पोरेट टॅक्स कमी केला जावा अशी देशातील उद्योजकांची मागणी होती,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“अनेक अर्थतज्ञांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा सल्ला दिला होता. निर्मला सीतारमन आणि नरेंद्र मोदींनी ती हिमंत दाखवली. महाराष्ट्र हे देशातलं सर्वांत मोठं कॉर्पोरेट हब असून त्याचा राज्याला फायदा होईल. जे पैसे वाचतील त्याच्यातून नव्याने गुंतवणूक होण्यास मदत मिळेल. तसंच रोजगार वाढीलाही हातभार मिळणार आहे,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बँकांच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचंही स्वागत केलं. तसंच ४५ लाखांच्या गृहकर्जावर सूट देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलं.