राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आदित्य ठाकरेंसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल असं सांगितलं. निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाचा असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ज्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही, तेदेखील महत्त्वाचे आणि पक्षासाठी मेहनत घेणारे नेते असल्याचं त्यांनी सांगितलं. एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

“पक्षाने गेल्या पाच वर्षात चांगलं काम केलं आहे. मला आज कोणतीही भीती वाटत नाही, कारण माझ्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष भक्कमपणे उभे आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “शिवसेनेकडून आम्हाला कोणताही त्रास नाही, ते आमचे मित्र आहेत. मित्राकडून कधी आपल्याला त्रास होतो का?”.

“मी भाजपाचा मुख्यमंत्री आणि आणि शिवसेनेचाही. हे युतीचं सरकार आहे,” असंही मुख्यमंत्री फडणवीस बोलले आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना पुढील मुख्यमंत्री करण्याच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, “आदित्य ठाकरे काय करणार किंवा त्यांना कोणतं पद दिलं जाईल हा शिवसेनेचा निर्णय असेल. जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील”. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र कोणताच संभ्रम नाही. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे सर्वांनाच माहिती आहे असं सांगत फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.

शरद पवारांच्या प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही – फडणवीस
ईडी तपास शरद पवारांचं नाव येण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, “शरद पवार यांच्या प्रकरणाशी राज्य सरकारचा काही संबंध नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर शरद पवारांविरोधात एफआयआर दाखल झाला. न्यायालयाकडून ही कारवाई करण्यात आली. ईडीने त्यांना गरज असेल तर चौकशीसाठी बोलावण्यात येईल असं सांगितलं आहे”.

पीएमसी बँकेतील आरोपींशी भाजपाचा काही संबंध नाही
“पीएमसी बँकेच्या प्रवर्तकांना अटक करण्यात आली आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्यात करण्याची कारवाई करण्यात आली. लोक संतापली असून, ही प्रतिक्रिया योग्य आहे. आम्ही खातेदारांना मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. प्रवर्तकांची संपत्ती जप्त करुन खातेदारांची मदत केली जात आहे. याप्रकरणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची भेट घेणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसंच घोटाळा करणाऱ्यांचा भाजपाशी काही संबंध नसल्याचं यावेली त्यांनी सांगितलं आहे.