बारामतीत ५० वर्षे पवारांची सत्ता आहे. मात्र ५० वर्षात बारामतीची काय अवस्था करुन ठेवली आहे. ५० वर्षात दुष्काळी भागात तुम्ही थेंबभर पाणी पोहचवू शकला नाहीत. बरं झालं दुष्काळी भागातल्या बारामतीकरांनी अजित पवारांना पाणी मागितलं नाही. मागितलं असतं तर काय झालं असतं? तुम्हीच ओळखा. मी काय ते बोलत नाही. मी तुम्हाला दाव्याने सांगतो माझ्या गोपीचंदला निवडून द्या या बारामतीला टँकरमुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बारामतीच्या एकाही गावात टँकर दिसणार नाही, बारामतीच्या प्रत्येक शेतात, शिवारात पाणी पोहचवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी धरणात पाणी नाही म्हणता आता काय धरणात…. असं म्हणत अभियंत्यांची आणि शेतकऱ्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आत्मक्लेश आंदोलनही केलं होतं आणि वादग्रस्त बोलून बसलो याबाबत माफीही मागितली होती. याच वक्तव्याची आठवण करुन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर टीका केली.

बारामतीत कमळ फुलवल्याशिवाय मी परत येणार नाही असं आश्वासन गोपीचंद पडळकर यांनी मला दिलं आहे. २१ ऑक्टोबरला जरी मतदान होणार असलं तरीही पुन्हा एकदा कुणाचं सरकार येईल? हे सांगण्याची कुणाही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. शेंबड्या पोराला विचारलं तर तोदेखील सांगतो महायुतीचं सरकार येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परवा शरद पवार म्हणाले की मी कुस्तीगिर संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्ही त्या संघटनेचे अध्यक्ष जरी असलात तरी तुम्ही असे कोणते पैलवान तयार केले ज्यांनी तुमची साथ सोडली. वयाच्या या टप्प्यातही तुम्हाला प्रचार करावा लागतो आहे यातच सगळं आलं असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी बारामतीत लगावला. बारामती या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री आले होते त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. या निवडणुकीत २० चा आकडाही राष्ट्रवादी काँग्रेस पार पडू शकणार नाही असाही दावा फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस ही आता नॅनो पार्टी झाली आहे. एका नॅनोत जेवढे लोक बसतात तेवढेच लोक यांचे निवडून येतील असा संकल्प आपल्याला सोडायचा आहे असंही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.