विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा आमची सत्ता येणार आहे. मात्र उतणार नाही मातणार नाही विकासकामं करत राहणार. सत्तेचा माज किंवा मुजोरी करणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत केलं आहे. नवी मुंबईतल्या एका विशेष सोहळ्यात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी आज भाजपात प्रवेश केला. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळालं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हटले?

“मला हल्ली पत्रकार विचारतात या निवडणुकीत काही मजा येत नाही. मग मी त्यांना विचारतो की काय झालं? मजा का येत नाही तर ते म्हणतात, सत्ता तुमची येणार हे ठाऊक आहे आता तुम्हाला 200 जागा मिळणार की 220 की नेमक्या किती जागा मिळणार हेच पाहणं बाकी आहे. तेव्हा मी त्यांना सांगतो की सत्ता आमची येणार हे जरी सत्य असलं तरीही हे तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे. आम्ही उतणार नाही, मातणार नाही. सत्तेचा माज किंवा मुजोरी करणार नाही ”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गणेश नाईक, संजीव नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमात झालेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. विरोधक म्हणतात “भाजपात मेगाभरती सुरु आहे, माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पक्षातल्या मेगागळतीची चिंता करा. जनतेच्या आमच्यावरील प्रेमामुळे पुन्हा एकदा आम्हीच सत्तेत येणार आहोत. सत्तेची मुजोरी दाखवणार नाही विकासकामं आणि जनहिताची कामं करतच राहणार. पुन्हा सत्ता येईल तेव्हा एकही राज्य महाराष्ट्राच्या स्पर्धेत उभं राहू शकणार नाही ” अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अशी ओळख असलेल्या गणेश नाईक यांनी आज भाजपात प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे. आज झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईक आणि संजीव नाईक यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.