विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे उलटले तरी सत्तासंघर्ष सुरु असून सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सत्ता स्थापनेच्या दृष्टीने गुरुवारी वेगवान घडामोडीचे संकेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपण शिवसेनेकडे भाजपाशी जुळवून घ्या असं आवाहन करण्यासाठी योग्य व्यक्ती नसल्याचं सांगितलं आहे. तसंच शिवसेना आपलं ऐकणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात एका खासगी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

अमृता फडणवीस यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांचं कौतूक केलं. त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०० टक्के देऊन काम केलं आहे, त्याच्याइतकं काम कोणीच करु शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याइतका न्याय इतर कोणी देऊच शकत नाही हे भाजपा नेते आणि जनतेला ठाऊक आहे. राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजपा सक्षम आहे”.

तसंच पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांमुळे भाजपाला निवडणुकीत इतक्या जागा मिळाल्या असल्याचं सांगितलं. भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या संघर्षावर बोलताना त्यांनी, “भाजपाशी जुळवून घ्या असं आवाहन मी शिवसेनेला करु शकत नाही. त्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. ते माझं ऐकणारही नाहीत,” असं मत व्यक्त केलं. तर अप्रत्यक्षपणे राज्याचं नेतृत्व करण्यासाठी भाजपा सक्षम असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

भाजपाने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. शिवसेना आता सरकारमध्ये सहभागी झाली नाही तरी पुढील १५ दिवसांनंतर सरकारमध्ये सहभागी होईल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. पुढील दोन-तीन दिवसांत सरकार स्थापण्याची योजना असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.