दिवाळी शुभेच्छांच्यानिमित्ताने सरकार स्थापनेची जुळवाजुळव

मुंबई : दिवाळी संपल्यावर सामान्यपणे फराळ किंवा शुभेच्छा देण्याच्यानिमित्ताने आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रघात आहे. मात्र राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत सत्तास्थापनेसाठीही फराळ व शुभेच्छांच्या निमित्ताने जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी दिवाळींच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती, असा दावा केला. तिकडे बारामतीत पवार कुटुंबियांना दिवाळी शुभेच्छा देण्याच्यानिमित्ताने राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन केले. दुसरीकडे सत्तास्थापनेत महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या अपक्षांचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे सत्र सुरूच होते. महायुतीतील घटक पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सेनेला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला देऊन दोन्ही पक्षातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

या सर्व घडामोडींनंतरही सांयकाळर्पयच चित्र अस्पष्टच होते. बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार आहेत. त्यानंतरच सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येईल. दरम्यान विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबपर्यंत आहे. २०१४ मध्येही सत्तास्थापनेच्या मुद्यावरूनच भाजप-सेनेत वाद होता. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला निमंत्रित केले होते. त्यानंतर सेना सत्तेत सहभागी झाली होती हे येथे उल्लेखनीय.

भाजप-शिवसेनेकडून स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट

मुंबई : सत्तास्थापनेच्या चढाओढीच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सेना व भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सुरूवातीला शिवसेनेचे नेते व विद्यमान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यपालांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती व महापौर असल्यापासूनच आपण दरवर्षी दिवाळीत राज्यपालांना भेटत असतो, असे त्यांनी सांगितले. मात्र सध्या सेना-भाजपमधील तणावाच्या पाश्र्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीनंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती व यावेळी राज्यपालांना राज्यातील सद्यास्थितीची माहिती दिली,असे अधिकृतपणे सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

आठवलेंचा शिवसेनेला सल्ला

मुख्यमंत्रीपदासह सत्तेत निम्मा वाटा मिळावा यासाठी एकीकडे शिवसेना आग्रही असतानाच दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष रिपाइंचे (अ)प्रमुख व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून हे पद आदित्य ठाकरे यांना द्यावे, असा सल्ला दिला. जनतेने महायुतीलाच बहुमत दिल्याने सरकार त्यांचेच स्थापन होईल ,असा विश्वास व्यक्त करताना याबाबत येत्या तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल,असे आठवले म्हणाले.

दोन्ही पक्षांकडून अपक्षांच्या भेटीगाठी

भाजप व सेनेने आता अपक्षांची जुळवाजुळव सुरू केली आहे. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, बडनेराचे आ. रवी राणा  व करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला तर नगर जिल्ह्य़ातील आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्ष प्रमुख  ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

लेखी आश्वासन हवे -संजय राऊत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती करताना सत्तेत सारखा वाटा हे सूत्र ठरले आहे. त्यानुसार पाच वर्षांपैकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद आम्हाला हवे आहे. मात्र भाजपवर विश्वास नसल्याने आम्हाला लेखी आश्वासन हवे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.