News Flash

पक्षातील बेदिली रोखण्याचे भाजपपुढे आव्हान ! सांगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी

तासगावमध्ये खासदार-सरकार गटामध्ये उभा दावा मांडला गेला असल्याचे चित्र आहे.

संग्रहित छायाचित्र

दिगंबर शिंदे, सांगली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सांगलीतील उरल्या-सुरल्या काँग्रेसला धक्का देणारी ठरली असली तरी पक्षांतर्गत मतभेदाला पायबंद घालण्यास कितपत यशस्वी ठरली याचे उत्तर विधानसभेची उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुरू होत असलेल्या रणमदानातच दिसणार आहे.

सांगली, तासगाव, जत, वाळवा आणि शिराळा या चार मतदारसंघांत आता संभाव्य उमेदवारांना उमेदवारीसाठी पक्षांतर्गत विरोधकांवर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागणार असून हा संघर्ष केवळ उमेदवारीपुरताच मर्यादित राहील याची खबरदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या अंतिम पर्वामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यातील काही नेते भाजपच्या गळाला लागले. यापैकी भाजपमध्ये गेलेले शिराळा तालुक्यातील कोकरूडचे सत्यजित देशमुख हे एक म्हणावे लागतील. आमदारकीची स्वप्ने काँग्रेसच्या राजकारणात सफल होत नाहीत, हे पाहून गेली दशकभर वाट पाहणारे देशमुख मनाने कधीच काँग्रेसबाहेर पडले होते. आयुष्यभर काँग्रेसच्या माध्यमातून मंत्री ते विधान परिषदेचे सभापतीपद भूषविणारे शिवाजीराव देशमुख यांना अखेरच्या काळात राष्ट्रवादी आणि भाजपने अविश्वासाचा ठराव आणल्याने देशमुख घराण्याने केवळ कधी तरी पुन्हा एकदा आमदारकीची वस्त्रे मिळतील असा समज करून घेतल्यानेच आतापर्यंत काँग्रेसची सोबत केली. मात्र इच्छापूर्ती होत नाही असे ठाम मत होताच सत्तेच्या वळचणीला जाणे पसंत केले.

जिल्हा परिषद निवडणुकीवेळी दोन्ही काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढत असताना शिराळा येथे मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी आघाडी केली होती. भाजपचे शिवाजीराव नाईक अडचणीत असल्याने मतांची बेरीज करण्यासाठी भाजपला आश्वासक चेहरा हवा होता. तो सत्यजित देशमुखांच्या माध्यमातून मिळाला.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याबरोबरच उरल्यासुरल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडाच्या बुरुजावर धडक मारून पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह आपल्या सरदारांसोबत या मोहिमेवर आले होते.

एकीकडे भाजपमध्ये गोळाबेरीज सुरू असताना पक्षांतर्गत गटबाजीही या महाजनादेश यात्रेत दिसून आली. हम सब एक आहे हे सांगण्यासाठी कचेरी चौकात एकत्र आलेल्या नेत्यांनी जनादेश यात्रेचे स्वागत करीत असताना आपआपल्या पोस्टरना वेगवेगळी जागा शोधली. भाजपचे विक्रम पाटील हे मुळचे म्हणून त्यांचे पोस्टर वेगळे तर विधानसभेसाठी दावेदारी असलेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा स्वागताचा सवतासुभा वेगळाच होता. यातच शिराळा उमेदवारीसाठी महाडिकांचा निराळाच रंग पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मतदारसंघातच कोंडीत पकडण्याचे भाजपचे डावपेच सुरू असताना ही पक्षांतर्गत बेदिली राष्ट्रवादीला पूरक ठरली नाही तरच नवल वाटावे अशी स्थिती आहे.

महाजनादेश यात्रेचा मार्ग निश्चित करीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गड असलेल्या मतदारसंघांनाच लक्ष करण्यात आल्याचे दिसून आले. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तीन मतदारसंघांतच यात्रेचा मार्ग ठरविण्यात आला होता. कोल्हापूरला जाण्यासाठी मिरज आणि सांगलीशिवाय रस्ताच नसल्याने रोड शोचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातील पलूस येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही जागा युतीच्या काळात शिवसेनेकडे होती. मात्र या ठिकाणी कदमांचे पारंपरिक विरोधक देशमुख गट आग्रही असल्याने भाजप ही जागा प्रतिष्ठेची करणार आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे मदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस यांची पलूसला जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

तासगावमध्ये खासदार-सरकार गटामध्ये उभा दावा मांडला गेला असल्याचे चित्र आहे. सरकार म्हणजे अजितराव घोरपडे यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द दिला असल्याने तासगावच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संकेत दिले. याचे पडसाद लगेच समाजमाध्यमात दिसत असून आता सुट्टी नाही, असा संदेश खासदारांच्या छबीवर अजित पवारांच्या आवाजात फिरवून वातावरण गढूळ केले जात आहे.

जिल्हय़ातील जतमध्ये पक्षांतर्गत मतभेद टोकाला गेले आहेत. विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्याविरुद्ध सर्व विरोधक एकत्र आले आहेत. या मतदारसंघातील राजकीय फेरमांडणीचा अथवा भाकरी पलटण्याचा फारसा विचार केला नाही. कदाचित याचे उत्तर काळावर सोडले असावे. िलगायत मतदारांच्या जिवावर जिल्हा परिषदेचे सभापती तमणगोंडा रवि पाटील यांची जोरदार तयारी सुरू असून त्यांच्या उमेदवारीसाठी शेजारच्या कर्नाटकातील भाजप नेत्यांकडूनही प्रयत्न सुरू असल्याने याबाबत जगताप यांची उमेदवारी अडचणीत सापडली आहे. तर खासदारांकडून बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचे नाव पुढे केले जात आहे.

खानापूर आटपाडीत शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत. त्यांचा घरोबा भाजपशी असल्याने महाजनादेश यात्रेने वाट वाकडी केली नाही. मात्र आटपाडीतून देशमुखांच्या गडीवरून काय शिजत आहे हे पाहिले तर काँग्रेसचे सदाभाऊ पाटील यांच्या दिमतीला फौजफाटा मिळू शकतो, यातच खासदारांचा परा कोणाशी होता, गोपीचंद पडळकर यांच्या वंचित आघाडीची भूमिका काय यावर येथील गणिते अवलंबून राहणार आहेत.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वारंवार सांगूनही जागा वाटपाचा तिढा सोडविण्याऐवजी राष्ट्रवादीच्या दबावाच्या राजकारणाला झुकून रामराम करण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे पक्षाच्या वाढीला पोषक न ठरता पक्षाच्या मुळावरच घाव घातला जात आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी वापर करून घेण्याची ही प्रवृत्र्ती पक्षाला घातक असल्यानेच यापुढे फारसी संधी मिळणार नाही.

      – सत्यजित देशमुख.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:53 am

Web Title: cm devendra fadnavis maha janadesh yatra in sangli zws 70
Next Stories
1 विदर्भात इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता
2 ‘अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात
3 अश्लीलतेचा ठपका ठेवत पहिलीतील मुलाला शाळेतून काढले
Just Now!
X