सांगली : राहुल गांधी आपण कोणासाठी भाषण करीत आहोत हेच विसरले आहेत. ते भाषणात बोलताना ७० वर्षे तुमच्यावर अन्याय झाले असे सांगत आहेत. मात्र यापैकी ६५ वर्षे त्यांच्याच पक्षाची सत्ता होती. मग एकप्रकारे ते त्यांच्याच काळात अन्याय झाल्याची कबुली देत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कामेरी येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसला काढला.

शिराळा मतदार संघातील कामेरी (ता. वाळवा) येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी आपण भाषण कोणासाठी करीत आहोत हेच विसरतात. भाषणात ते बोलताना ७० वर्षे तुमच्यावर अन्याय झाले असे सांगत आहेत. मात्र यापैकी ६५ वर्षे तर त्यांच्याच पक्षाची सत्ता होती हे ते विसरतात. आता त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले हे आम्ही कसे सांगणार असा प्रश्न करत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्या प्रचारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, की ते अशी विधाने करत एकप्रकारे आमच्याच पक्षाचा ते प्रचार करीत असून याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत, तेवढे थोडेच आहेत.

निवडणूक निकालाबाबत फारसे काही उरलेलेच नाही. राज्यात कोणत्याही पोराला जर विचारले तर तेही महायुतीचेच सरकार येईल असेच सांगेल. राज्यात दोन्ही काँग्रेसची अवस्था सारखीच असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही आता कोणीच राहायला तयार नाही, असेही मुख्यमंत्री सांगितले.

काँग्रेस आघाडीच्या १५ वर्षांच्या काळात राज्यासाठी त्यांनी काय केले याचा लेखाजोखा मांडा, आम्ही गेल्या ५ वर्षांच्या काळात काय केले याचा हिशोब देण्यास तयार आहोत. या सरकाराने शेतक ऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी सांगितले.