लोकसभा निवडणूक निकालाआधी केदारनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची आठवण यावी, अशीच घटना महाराष्ट्र विधानसभा निकालाआधी घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केदारनाथांचा मार्ग धरला आहे. उद्या (२४ ऑक्टोबर) विधानसभेचे निकाल जाहीर होणार असून, फडणवीस केदारनाथला पोहोचले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले असून तेथे धार्मिक विधी पूर्ण केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे केदारनाथांच्या दर्शनाचे फोटो ट्विट करून फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. “सकाळी केदारनाथाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले. हर हर महादेव” असे ट्विट फडवणीस यांनी केलं आहे.

२४ ऑक्टोबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या विधानसभा निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार युतीची सत्ता येणार असली तरी पवारांचा प्रचार आणि युतीमधील बंडखोरीमुळे निकाल वेगळा लागू शकतो, असंही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.