12 November 2019

News Flash

मुख्यमंत्र्यांकडून अधिक जबाबदार वक्तव्याची अपेक्षा!

‘पवार पॅटर्न’वरील टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची परंपरा होती. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री असावेत, असा माझा समज होता. पण निवडणूक प्रचाराच्या काळातील त्यांची भाषणे किंवा विधाने बघितल्यावर त्यांच्यात सुसंस्कृतपणाचा अभाव दिसला, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘पवार पॅटर्न’ या निवडणुकीत बाद होईल, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेताना दिले आहे.

विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या प्रचाराची धुरा शरद पवार यांनी एकहाती वाहिली. पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी पक्षांतर केल्यावर पक्षात एकूणच मरगळ आली असताना राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार केले. प्रकृती साथ देत नसतानाही दररोज चार ते पाच जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांना बळ दिले आणि लढण्याची ताकद दिली. साताऱ्यात शुक्रवारी भर पावसात ओलेचिंब झाले असतानाही केलेले भाषण गाजले. समाज माध्यमांवर पवारांच्या या कृतीचे कौतुक झाले. ‘कितीही संकटे आली तरी मी हरणारा नाही. उलट अशा परिस्थितीत लढत राहायचे’ ही आपली राजकीय कारकीर्दीतील सुरुवातीपासूनची भूमिका असल्याचे  पवार यांनी स्पष्ट केले.

  • सत्तेचा वाट्टेल तसा वापर करून पुन्हा सत्ता मिळवायची ही भ्रष्ट राजकीय संस्कृती शरद पवार यांनी महाराष्ट्रात तयार केली होती. राजकारणाचा हा ‘पवार पॅटर्न’ विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातून बाद होईल, असे भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तविले आहे. याबाबत आपली प्रतिक्रिया?

– महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय पंरपरा आहे. सुसंस्कृतपणा पाळला जातो. मी ते पथ्य पाळतो. यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या या विधानाबद्दल बोलणे योग्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कुस्ती, मल्ल वगैरे उल्लेख केले. पण मी राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. मला कुस्तीतील सारे समजते.

  • निवडणूक प्रचारात तुम्ही राज्य पालथे घातले. लोकांचा प्रतिसाद कसा होता?

– राज्यातील भाजप सरकारवर जनता नाराज आहे. बेरोजगारी, शेतीचे प्रश्न हे गंभीर आहेत. सामन्य जनतेशी संबंधित प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पार थट्टा झाली. यूपीए सरकारने एका आदेशान्वये देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. भाजप सरकारला राज्यातील पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करता आलेले नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा काहीच उल्लेख केलेला नाही. सरकारी शेतकरी आणि बेरोजगारीबाबत गंभीर दिसत नाही. आमच्या सरकारच्या काळात राज्यात नव्याने उद्योग सुरू करण्यात आले. बाहेरून गुंतवणूक व्हावी म्हणून प्रयत्न केले. पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आदी सर्वच भागांमध्ये उद्योग वाढतील याकडे लक्ष दिले. याउलट भाजप सरकारच्या काळात जुनेच उद्योग बंद पडत गेले आणि बेरोजगारी वाढली. रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

  • निवडणुकीच्या तोंडावर अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला. प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी तुम्हालाच लक्ष्य केले. याबाबत प्रतिक्रिया काय?

– राज्य सहकारी बँकेशी आपला काडीमात्र संबंध नव्हता. आपण कधीही या बँकेच्या संचालक मंडळाचा सदस्य नव्हतो. ठरावात माझे नाव आहे म्हणून गुन्हा दाखल झाला, असे मुख्यमंत्री आता सांगत आहेत. हे सारेच समजण्याच्या पलीकडचे आहे. राजकीय हेतूने ही कारवाई झालेली असावी. ईडी असो वा अन्य कोणतीही अन्य यंत्रणा असो,  आपण कोणालाही घाबरत नाही. मोदी-शहा-फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले, यावरून राष्ट्रवादीचा धसका भाजपच्या मंडळींनी घेतलेला दिसतो.

First Published on October 20, 2019 12:52 am

Web Title: cm showed a lack of culture says sharad pawar abn 97