उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. जो निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य असेल तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील. राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करेल. उद्धव ठाकरे जी भूमिका मांडत आहेत ती हीच आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे आज आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत असंही संजय राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

मतदार वाट बघत आहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी होईल? असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे भाजपाला वगळून पर्याय तयार आहे आणि संख्याबळही तयार आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. भाजपाकाडे संख्याबळ नसल्यामुळेच ते सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्यापेक्षा जास्त मला काहीही नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंच भाजपाने आता सत्तेची हाव सोडून द्यावी असंही संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

साम-दाम-दंड- भेद भाजपा वापरतं आहे का? असं विचारताच ही नीती तर शिवसेनेची आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. साम-दाम-दंड भेद हा व्यक्तीचा नाही तर सत्तेचा असतो. आता कोणतीही घटनाविरोधी कृत्यं, दबाव, धमक्या चालणार नाहीत. २०१४ ची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये फरक आहे. भाजपाकडून जर हे सांगितलं जातं आहे की महायुतीला जनादेश मिळाला आहे तर मग ते सत्तास्थापनेचा दावा का करत नाहीत? असंही राऊत यांनी विचारलं आहे.