ऐश्वर्या नारकर, अभिनेत्री

’निवडणुकीतील मुख्य मुद्दे कोणते?

विधानसभा निवडणुकीत सामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था वाईट आहे. यामुळे प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि मेट्रोची कामे यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. यामध्ये सामान्य नागरिकांची शक्ती आणि वेळ वाया जातो. याबरोबरच राज्यातील शिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. इयत्ता पहिलीपासून शाळांमध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून पुस्तकाबरोबरच व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांला मिळेल.

’या मुद्दय़ांना राजकीय पक्ष भिडतात का?

सध्या राजकीय पक्ष सामान्य माणसाच्या मुद्दय़ांना अत्यंत कमी लक्ष देतात. त्यांच्या प्रचारात तसेच भाषणात समस्यांना पाहिजे तसे स्थान देण्यात येत नाही. राजकीय पक्षांनी प्रचार करताना या प्रश्नांना महत्त्व देणे गरजेचे आहे.

’उमेदवार असल्यास प्राधान्य कशाला द्याल?

सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांना जास्त प्राधान्य दिले असते. रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी, कचरा आणि  प्रदूषण या रोजच्या जगण्यातील समस्या आहेत. मी उमेदवार असल्यास मतदाराशी निगडित समस्यांना जास्त महत्त्व देईन.

’नवीन मतदारांना काय संदेश द्याल?

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून त्याने बजावला पाहिजे. मतदारांच्या एका मतामध्ये निकाल बदलण्याची ताकद असते. त्यामुळे मतदारांनी जागरूकतेने मतदान केले पाहिजे. उमेदवाराची शिक्षण पात्रता आणि केलेली विकासकामे तपासूनच योग्य व्यक्तीस मतदान करावे.

’प्रचारात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार बंद व्हायला पाहिजेत असे माझे वैयक्तिक मत आहे. उमेदवाराने मतदारांसाठी केलेल्या कामांवरून त्याची ओळख पटायला पाहिजे. आणि त्यातूनच लोकांनी उमेदवाराची निवडणूक करणे गरजेचे आहे. प्रचारात पोकळ आश्वासने, दिखाऊपणा आणि शिवराळ भाषा या गोष्टी टाळायला पाहिजे. सहज आणि सोप्या पद्धतीने अत्यंत कमी पैसे खर्च करून प्रचार करणे अपेक्षित आहे.

(संकलन : मानसी जोशी)