बिपीन देशपांडे

कॅबिनेटमंत्री हवा की आमदार?, विकासाचे राजकारण करायचे की गुंडगिरी फोफवायची, असे प्रचाराला टोकदारपणा देणारे प्रश्न पुढे करून पंकजा मुंडे समर्थकांकडून समाजमाध्यमावर प्रचार केला जात आहे. तर दुसरीकडे कॅबिनेटमंत्री हवा की  धावून येणारा, कामे करणारा सेवक?, असा प्रचार धनंजय मुंडे यांच्या यंत्रणेकडून सुरू आहे. ताई आणि भाऊ नावाने परिचित असलेल्या या नेत्यांमध्ये सध्या परळीत जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या घरातील सदस्यांमध्ये होणारी ही निवडणूक आहे. मुंडे यांच्या कन्या पंकजा आणि पुतणे धनंजय यांच्यात दुसऱ्यांदा थेट लढत होत आहे. त्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरणारी ही निवडणूक आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर (२०१४) घेतलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या दुसऱ्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे या सहा लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्य़ाने निवडून आल्या. त्यांचा हा विजय सहानभुतीच्या लाटेवर मोजला गेला. त्याचीच पुनरावृत्ती पंकजा यांच्याबाबतही घडेल, असा तेव्हा तर्क लावला होता. मात्र पंकजा यांच्या विरोधात उभे असलेले त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांना कडवे आव्हान दिले. गोपीनाथ मुंडे हयात असतानापेक्षाही पंकजा यांचे मताधिक्य घटले. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या संघटनात्मक बांधणीची चर्चा अधिक झाली. आता पुन्हा या भावंडांमध्ये लढत होत आहे.

परळी हा मराठानंतर वंजारा समाजाचे प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. बहुतांश गावे ही वंजारा बहुल. याच समाजातील नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी परळी मतदारसंघाचे तीन दशके प्रतिनिधित्व केले आहे. सुमारे ७४ हजार मतदार असलेल्या वंजारा समाजाचे मतदान हे मुंडे यांना एकगठ्ठा पडते. आताही ७५ टक्के मतदान हे पंकजा यांनाच पडेल, असा अंदाज मानला जातो. मात्र धनंजय यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना सांभाळत स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. वंजारा समाजापेक्षाही अधिक मते मराठा समाजाची असून ही मते कोण घेतो याबद्दलही चुरस आहे. याशिवाय दलित आणि मुस्लीम मतदारांचा कौलही इथे निर्णायक ठरणार आहे. यासाठी वंचितच्या उमेदवार किती मते घेणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे. परळी हे बारा ज्योतिर्लिगापैकी एक असे तीर्थस्थळ आहे. येथे लिंगायत समाजाचीही संख्या लक्षणीय आहे. बराचसा लिंगायत समाज गोपीनाथ मुंडे यांच्याजवळचा मानला जातो.

जमेच्या बाजू

पंकजा मुंडे : मतदारसंघात दोन हजार कोटींच्या जवळपास निधी देऊन विकास कामांचा दावा. त्यात ग्रामपंचायती, मुख्यमंत्री ग्रामसडक, जलसंधारण, राष्ट्रीय महामार्गासाठी, बचतगट चळवळ आदी.

धनंजय मुंडे : प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्यासाठी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे. गुजरातमधील एका यंत्रणेला प्रचारबुथ नियोजन सांभाळण्याची जबाबदारी. दुष्काळात पाण्यासाठी होणारी ससेहोलपट रोखण्यात यश.

अडचणीच्या बाजू

पंकजा मुंडे : स्पष्टवक्तेपणामुळे कार्यकर्ते दुरावले. संपर्कासाठी कार्यकर्त्यांचे जाळे नाही. मुंबईतूनच सूत्रे हलवतात, असा आरोप. विकासकामांचे ‘मार्केटिंग’ नाही. गडकरींसारखा नेता पाठीशी असतानाही अंबाजोगाई-परळी रस्त्याचे काम रखडले.

धनंजय मुंडे : काही कार्यकर्त्यांच्या हेकेखोरपणामुळे गुंडप्रवृत्तींना बळ देत असल्याचा आरोप. गोपीनाथ मुंडेंची कन्या म्हणून पंकजांना मिळणारी सहानुभूती.