चंद्रशेखर बोबडे

शेतकरी आत्महत्या, वाढत8५ी बेरोजगारी, मंदीमुळे उद्योगांवर आलेले संकट यामुळे सत्ताधारी पक्षाविरुद्धच्या लोकांच्या मनात निर्माण झालेल्या नाराजीचे सत्ताधाऱ्याविरुद्ध मतांमध्ये परिवर्तन करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचा विरोधी पक्षाकडे असलेला अभाव आणि या उलट सत्ता, कार्यकर्त्यांची फौज व निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक सामग्रीचे भक्कम पाठबळ या आधारावर आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भात २०१४ च्याच निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात आता भाजपचे प्राबल्य आहे. विदर्भात एकूण विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वतंत्र लढून ४४ जागाजिंकल्या होत्या. शिवसेनेने ६१ जागा लढवल्या, त्यापैकी त्यांना फक्त चार जागा जिंकता आल्या. यावरून सेनेची स्वबळावरची या भागातील ताकद लक्षात येते. दुसरीकडे विरोधी पक्षाचा विचार केला तर काँग्रेसने २०१४ मध्ये सर्वच्या सर्व ६२ जागा लढवून १० जागा जिंकल्या. विदर्भात प्रयत्न करूनही राष्ट्रवादीला पाय रोवता आले नाही. या पक्षाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. दोन जागा अपक्षांनी तर एक जागा आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने जिंकली होती.

मूलभूत प्रश्न तसेच

विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न मोठा आहे. यासाठी सिंचन सुविधांचा अभाव प्रमुख कारण आहे. मागील निवडणुकीत याच मुद्दय़ांचे भाजपने प्रचारात भांडवल केले होते. पाच वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढल्या, सिंचन घोटाळ्याचा तपास अद्यापही सुरूच आहे. उलट पाच वर्षांत बेरोजगारी वाढली. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी नाराज आहे. सध्याच्या मंदीची या भागातील उद्योगांनाही झळ बसली आहे. मात्र हे सर्व मुद्दे लोकांपुढे नेऊन त्यांच्या नाराजीचे सरकारविरुद्ध मतांमध्ये परिवर्तन करण्यात विरोधक अपयशी ठरले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीने दहा पैकी ८ जागा जिंकल्या. राज्यात काँग्रेसला मिळालेली एकमेव जागा ही विदर्भातील चंद्रपूरची होती.

राज्यातील इतर भागाप्रमाणे विरोधी पक्षातून भाजपमध्ये जाणाऱ्या मोठय़ा नेत्यांची संख्या सध्या विदर्भात नाही. इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने उमेदवारी देताना भाजपला तारेवरची कसरत करावी लागेल. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच आहे. विदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत विदर्भातील तीन जागांवर काँग्रेसला फटका बसला होता. यावेळीही आघाडी स्वतंत्र लढणार असल्याने मतविभाजनाचा धोका काँग्रेसला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ पिंजून काढला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘पर्दाफाश’ यात्रा काढली. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आणि सेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची जनाशीर्वाद यात्रा विदर्भातील काही मतदारसंघातून फिरली.

विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दक्षिण पश्चिम नागपूर), अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर-जि. चंद्रपूर) आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार (ब्रह्मपुरी -चंद्रपूर) या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे.

विदर्भ -विधानसभा

२०१४ पक्षबळ

एकूण जागा      ६२

भाजप     ४४

शिवसेना   ०४

काँग्रेस     १०

राष्ट्रवादी   ०१

अपक्ष व इतर    ०३

लोकसभा – २०१९

एकूण जागा  १०

०५ भाजप

०३ शिवसेना

०१ राष्ट्रवादीप्रणीत

०१ काँग्रेस

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्ण तयारी झाली आहे. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होईल व प्रचाराला सुरुवात होईल. काँग्रेसपुढे कुठलेही आव्हान नाही, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.’

-विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते, विधानसभा

‘‘आम्ही विकासाच्या नावावर मते मागणार आहोत, याचा लाभ आम्हाला याही निवडणुकीत मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला.’’

– आमदार गिरीश व्यास, प्रवक्ते भाजप