संतोष प्रधान

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी समसमान १२५ जागा लढतील, असे जागावाटप राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्याने, पहिल्या फळीतील अनेक नेत्यांच्या पक्षांतरामुळे कमकुवत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे काँग्रेसने सपशेल नमते घेतल्याचे जाणवते. कारण आतापर्यंत झालेल्या आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाटय़ाला जास्त जागा आल्या होत्या.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपाचा घोळ नेहमीच अखेपर्यंत सुरू राहतो. यंदा मात्र निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच आघाडीचे जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. काँग्रेस १२५ तर राष्ट्रवादी १२५ जागा लढणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचे पवार यांनी जाहीर

केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही याच सूत्राने जागावाटप होईल, अशी पुष्टी जोडली. अर्थात, मित्रपक्षांकडून जास्त जागांची मागणी झाल्यास दोन्ही पक्षांनी आपापल्या वाटय़ाच्या जागा द्याव्यात, असेही सूत्र उभयतांमध्ये ठरले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रितपणे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यापूर्वी २००४ आणि २००९ मध्ये दोन्ही काँग्रेस संयुक्तपणे लढले होते. २०१४ मध्ये आघाडी झाली नव्हती. २००४च्या निवडणुकीत काँग्रेस १५७ तर राष्ट्रवादीने १२४ जागा आघाडीत लढविल्या होत्या. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या होत्या. २००९ मध्ये काँग्रेस १७० तर राष्ट्रवादीने ११३ जागा लढविल्या होत्या. या तुलनेत पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाटय़ाला १२५ किंवा त्यापेक्षा कमी जागा येऊ शकतात. आघाडीत प्रथमच काँग्रेसच्या वाटय़ाला कमी जागा येत आहेत. काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीही कमकुवत झाला आहे. राष्ट्रवादीचे अनेक बिनीचे शिलेदार भाजप किंवा शिवसेनेच्या गोटात गेले आहेत.

सोनिया गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी फेरनिवड होणे हे राष्ट्रवादीच्या पथ्यावरच पडले आहे. कारण राहुल गांधी हे राष्ट्रवादीच्या कलाने घेत नसत. लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसने मान्य केली नव्हती. राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची परिस्थिती तेवढी वाईट नाही. तरीही काँग्रेसने माघार घेतल्याबद्दल पक्षात आश्चर्य व्यक्त केले जाते.

आतापर्यंतचे जागावाटप

२००४ – काँग्रेस – १५७, राष्ट्रवादी – १२४

२००९ – काँग्रेस – १७०, राष्ट्रवादी – ११३

(संदर्भ : निवडणूक आयोग आकडेवारी)

जागावाटपाचे सूत्र हे केंद्रीय पातळीवर निश्चित झाले. निवडून येण्याची क्षमता याआधारे जागांची अदलाबदल केली जाईल. याआधी जास्त मित्रपक्ष बरोबर नव्हते. यंदा मित्रपक्षांना सामावून घेण्याकरिताच दोन्ही पक्षांना आपापल्या वाटय़ाच्या जागा सोडाव्या लागणार आहेत.

– बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष