राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच आईची लेकरं आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर आम्ही दोन्ही पक्ष खेळलो आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही एकत्र येऊ असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत. सध्याच्या वातावरणात दोन्ही पक्ष थकले आहेत असंही सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. सोलापुरात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले दिग्गज नेते मानले जातात. काँग्रेस पक्षातही त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने केलेले हे  वक्तव्य अत्यंत सूचक आहे असंच म्हणता येईल. त्याचमुळे त्यांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही दोन्ही पक्षांनी सध्याच्या हिटलरशाही विरोधात दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. हातात हात घालून वाटचाल करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेलं मत हे त्यांचं व्यक्तीगत मत आहे. मात्र सध्याचं देशातलं वातावरण पाहता आघाडीतल्या दोन्ही पक्षांनी एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत जितेंद्र आव्हाड आणि सचिन सावंत यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे ?

“काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील”

सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने जितेंद्र आव्हाड आणि सचिन सावंत या दोघांचीही प्रतिक्रिया घेतली. सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की देशात सध्या हिटलरशाही आहे. या हिटलरशाही विरोधात एकत्र यायचं असेल तर दोन्ही पक्षांनी हातात हात घेणं गरजेचं आहे. विलीनीकरणाचं म्हणाल तर त्याबाबतचा निर्णय शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे घेऊ शकतात मी त्याबाबत बोलणं योग्य नाही. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की जे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं ते त्यांचं वैयक्तीक मत आहे. मात्र सध्याचं जे वातावरण देशात आहे, ज्या प्रकारचं सरकार आहे ते उलथवून टाकायचं असेल तर दोन्ही पक्षांनी एकत्र येणं आणि एकमेकांना साथ देणं आवश्यक आहे.