हर्षद कशाळकर, अलिबाग

शिवसेनेचे प्राबल्य असलेला मतदारसंघ म्हणून महाड विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. यावेळी शिवसेना विरुध्द काँग्रेस अशी थेट लढत मतदारसंघात होत असते. पण यंदा काँग्रेसला राष्ट्रवादी सोबत शेकापची मदत होणार असल्याने शिवसेनेसमोरील आव्हान वाढणार आहे.

महाड पोलादपुर आणि माणगाव तालुक्यातील निजामपुर पट्टा मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. महाडचा शहरी भाग सोडला तर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. मतदारसंघात बहुतांश जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे आहेत. मतदारसंघात २ लाख ८३ हजार ७४५ मतदार आहेत. यात १ लाख ४१हजार १९६ पुरुष तर १ लाख ४२ हजार  २९१ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार संघात आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  शिवसेनेकडून आमदार भरत गोगावले, तर काँग्रेस कडून माजी आमदार माणिक जगताप निवडणूक रिंगणात आहेत. या दोघांमध्येच पुन्हा प्रमुख लढत होणे अपेक्षित आहे.

मतदारसंघात प्राबल्य असूनही नुकत्याच लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. पक्षांतर्गत नाराजी गीते यांना भोवली होती. त्यामुळे गीते यांना २०१४ मध्ये १७ हजाराचे मताधिक्य देणारया या मतदारसंघात २०१९ मध्ये जेमतेम सात हजार मतांची आघाडी मिळाली होती.

१९५२ ते १९८० च्या कालखंडात मतदार संघातून चार वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून गेले होते. मात्र १९८० नंतर मतदारसंघात काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागली. तर शिवसेनेनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत करण्यास सुरवात केली. शिवसेनेचे प्रभाकर मोरे सलग तीन वेळा मतदारसंघाचे आमदार झाले. मात्र २००४ मध्ये त्यावेळी राष्ट्रवादीत असणारया माणिक जगताप यांनी त्यांच्या पराभव केला. मात्र २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेनी पुन्हा एकदा मतदारसंघावर आपली पकड घट्ट केली. भरत गोगावले सलग दोन वेळा विजयी झाले. दोन्हीवेळेस त्यांनी माणिक जगताप यांचा पराभव केला आहे.

मतदारसंघात पुन्हा एकदा भरत गोगावले आणि माणिक जगताप अशी तुल्यबळ नेत्यामधे लढाई होणार आहे. ग्रामिण भागातील संघटान्मक बांधणी आणि दांडगा संपर्क भरत गोगावले यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची साथ मिळाल्याने हि काँग्रेसच्या माणिक जगताप यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मनसेचा उमेदवार निवडणूक िरगणात असला तरी सघटनात्मक बांधणी नसल्याने त्यांच्याकडून मोठ्या चमत्काराची अपेक्षा बाळगता येणार नाही. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस मध्येच मतदारसंघासाठी थेट लढत होणार आहे. शिवसेनेसमोर आपला गड कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.

मतदारसंघातील समस्या  काय आहे?

काळ प्रकल्पाचे रखडलेले काम, मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण, महामार्ग प्रकल्पबाधित शेतकरयांच्या भुसंपादन मोबदल्याचा प्रश्न, आंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, उन्हाळ्यात गावागावात जाणवणारी पाणी टंचाई, रायगड किल्ला संवर्धनाचे रखडलेले काम, रासायनिक कंपन्याचे दुषित पाणी, वीस वर्षांपासून रखडलेला पंचतारांकीत एमआयडीसी प्रकल्प, बंद पडणारे कारखाने, त्यामुळे निर्माण होणारी बेरोजगारी, नद्यांचे प्रदुषण आणि गाळ समस्या, दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन, पुण्याला जोडणारया भोर मार्गाचा प्रश्न यासारख्या समस्या मतदारसंघात आहेत.

‘पाच वर्षांत जवळपास तीनशे कोटींहून अधिकची कामे मतदारसंघात झाली आहे. एकही गाव असे नाही जिथे विकास काम झालेली नाहीत. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा मतदार मला निवडून देतील असा विश्वास आहे.’

– भरत गोगावले. शिवसेना उमेदवार

‘पाच वर्षांत नुसत्या घोषणा करण्यापलीकडे शिवसेना भाजपने काही केलेले नाही. मतदारसंघातील रस्ते, पाणी, आरोग्य यासारखे मुलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत. त्यामुळे यंदा परिवर्तन अटळ आहे. मतदार सुज्ञ आहेत. ते आपाला रोख व्यक्त करतील.’

 –   माणिक जगताप , काँग्रेसचे उमेदवार