नितीन राऊत यांच्यासह तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसकडून लढण्यासाठी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबतच उत्तरमधून डॉ. नितीन राऊत, मध्यमधून बंटी शेळके आणि पूर्व नागपुरातून नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनीही अर्ज भरला.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी हेतीनही उमेदवार संविधानचौकात एकत्र आले आणि त्यांनी एकीचे दर्शन घडवले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयातपोहचले.भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांची संविधान चौकातून मिरवणूक निघाली. डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले आणि मिरवणुकीने एक एक करीत सर्व उमेदवार तहसील कार्यालयात पोहचले. डॉ. आशीष देशमुख यांच्यासोबत माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नगरसेवक प्रफुल गुडधे उपस्थित होते.

डॉ. नितीन राऊत आणि पुरुषोत्तम हजारे यांच्या समर्थकांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. यावेळी आगे बढोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, गिरीश पांडव, तानाजी वनवे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातप्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले होते. कार्यकर्त्यांना लांबच अडवण्यात येत होते.

या मतदारसंघात मुख्यमंत्री चारवेळा निवडून आले आहेत. ते वेगळ्या विदर्भाची मागणी सातत्याने करीत असत. पण, गेल्या पाच वर्षांत त्यांनी विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्या विरोधात मी लोकांचा वकील बनून निवडणुकीच्या माध्यमातून खटला चालवत आहे. यात दक्षिण-पश्चिमची जनता माझ्यासोबत राहील आणि विदर्भद्रोह करणाऱ्यांना नाकारतील. – डॉ. आशीष देशमुख

उत्तर नागपुरात काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नाही. मी एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत अजिबात विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये येथे काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे विधानसभेत माझा विजय निश्चित आहे. – डॉ. नितीन राऊत