महाराष्ट्रतील सत्तासंघर्ष व सध्या सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसदेच्या आवारात सरकारविरोधी निषेध मोर्चा काढण्यात आला. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी हातात फलक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. तसेच, या मुद्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरत ‘अबकी बार बेईमानो की सरकार’ , ‘लोकशाहीची हत्या करणे बंद करा’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

दुसरीकडे विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला. यानंतर दुपारी लोकसभेचे कामकाज स्थिगित करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, मी संसदेत एक प्रश्न विचारू इच्छित होतो. परंतु आता हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ उरलेला नाही, कारण महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे.

भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. सत्तास्थापनेसंदर्भात राज्यापालांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला. ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर उद्या (२६ नोव्हेंबर) निर्णय येण्याची शक्यता आहे.