शेजारच्या कर्नाटकाप्रमाणे आता महाराष्ट्रातही रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु झाले आहे. महायुतीमधील मतभेद तीव्र होत चालले आहेत. आमदारांची फोडाफोड होण्यापूर्वीच सर्वच पक्ष सावध झाले आहेत. शिवसेनेने रंगशारदा हॉटेलमध्ये आपल्या सर्व आमदारांची निवासाची व्यवस्था केल्यानंतर आता काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना राजस्थानला हलवणार आहे.

काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आमदारांना पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी जमण्यास सांगण्यात आले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. काही आमदारांना थेट जयपूरला पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. महायुतीने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे बहुमत आहे. पण मुख्यमंत्रीपद सत्तेतील वाटयावरुन दोघांमध्ये वाद सुरु आहेत. याआधी कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स रंगले होते. आता त्याचाच पुढचा अंक महाराष्ट्रात दिसत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल सकाळी शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची शक्यता फेटाळून लावली होती. शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही असेही संजय राऊत म्हणाले होते. पण शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था केली. सध्याच्या परिस्थितीत सर्व आमदारांनी एकत्र असणे आवश्यक आहे. उद्धवजींचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे असे आमदार सुनील प्रभू म्हणाले. म