निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी घेतलेली भूमिका जनतेलाही आवडली, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम यांनी संजय राऊत यांची लिलावती रूग्णालयात भेट घेतली. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.

अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद, तसंच सत्तेतील समसमान वाटा देणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. मुख्यमंत्रिपद तसंच काही महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्यात येणार नसल्याचं भाजपानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दोन्ही पक्षांतील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर लीलावती रूग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. दरम्यान, प्रकृतीची विचारणा करण्यासाठी आज (बुधवार) अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. आपण राऊत यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठीच भेट घेतली असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं.

“आमच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. राऊत यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठीच आम्ही त्यांची भेच घेतली. आमची जी भूमिका आहे ती लवकरच जाहीर केली जाईल. या काळात राऊत यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. तसंच राऊत यांची भूमिका राज्यातील जनतेलाही आवडली आहे,” असं बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.