शरद पवार हे नाव महाराष्ट्राला नवखं नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारात घडलेल्या शरद पवार नावाचं गारूड अजूनही कमी झालेलं नाही. आजही वयाच्या ७८ व्या वर्षीही पवार एखाद्या तरुणासारखं फिरत आहेत. त्यामुळे पक्षातील एक एक नेता विरोधी पक्षात जात असतानाही पवारांमध्ये ही जिद्द कोठून येते, असाही प्रश्न पडू शकतो. शरद पवारांमध्ये लढण्याची जिद्द आणि चिकाटी आता आलेली नाही. ही जिद्द तेव्हापासून आहे, जेव्हा एकच चूक तीन वेळा घडली म्हणून मार्शलनं पवारांनी विधानसभेतून बाहेर काढलं होतं. त्यावर उत्तर देताना शरद पवार मार्शलला म्हणाले होते, आता जातोय पण आमदार म्हणूनच विधानसभेत येणार…!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवारांचं राजकीय वर्तुळातील स्थान आजही मोठ आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारही शरद पवार या नावाभोवती फिरताना दिसतोय. महाराष्ट्र आणि दिल्लीत विविध पद भूषवणाऱ्या शरद पवार यांनी बारामतीत दहावीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पवार पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. याच काळात पवारांना मुंबई बघितली पाहिजे असं वाटायचं. त्यावेळी त्यांचं वय होतं २० वर्ष. त्यापूर्वी शरद पवारांनी कधीही मुंबई बघितली नव्हती. मग मित्रासोबत मुंबई बघण्याची संधी पवारांना चालून आली.

साल होतं १९६०. शरद पवार मुंबई आले. मित्राने पवारांना विचारलं मुंबईत काय पाहायचं. पवार म्हणाले, “चार गोष्टी सांगितल्या. त्यात एक इच्छा होती महाराष्ट्राची विधानसभा बघण्याची. शरद पवारांचा मित्र त्यांना विधानसभेत घेऊन आला. विधानसभेच्या गॅलरीत पवार येऊन बसले. तेव्हा आचार्य अत्रे हे सभागृहात भाषण करत होते. भाषण ऐकत असताना शरद पवार मस्त पायावर पाय ठेवून बसले. विधानसभेत असं बसता येत नाही, हे पवारांना माहितीच नव्हतं. पायावर पाय टाकून बसलेल्या पवारांजवळ मार्शल आला आणि म्हणाला, ‘सरळ बसा, असं बसता येत नाही. मग पवार पुन्हा नीट बसले. पुन्हा आचार्य अत्रेंच भाषण ऐकण्यात तल्लीन झालेल्या पवार यांनी पायावर पाय टाकले. मार्शलने पुन्हा येऊन सांगितलं. पवार म्हणाले, ‘आता नाही करणार.’ थोडा वेळ गेला. भाषणात एकाग्र झालेल्या शरद पवारांनी पुन्हा पायावर पाय टाकले.

मग काय? मार्शलनं पवारांची कॉलर धरली अन् विधानसभेच्या बाहेर काढलं. शांत बसतील ते पवार कसले. पवार मार्शलला म्हणाले, आता आलो तर गॅलरीत येणार नाही. डायरेक्ट आमदार होऊन विधानसभेतच येणार… पुढे १९६७ साली शरद पवार आमदार होऊन विधानसभेत गेले. हा किस्सा पवारांनीच एका मुलाखतीत सांगितला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sharad pawar challenge to legislative assembly marshal bmh
First published on: 15-10-2019 at 07:40 IST