राज्यात सरकार स्थापनेसाठीची प्रक्रिया काहीशी लांबली असली तरी आता ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यानंतर आता आघाडीचे नावही निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उद्या विधानभवनात काँग्रेसची बैठक पार पडणार असून या बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. काँग्रेसकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या विधिमंडळ नेत्यांची निवड केली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपाकडून, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेकडून तर अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून उद्या विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे.

दरम्यान, शिवसेनेसोबत सत्तास्थापनेच्या दृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा अंतिम झाल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यानंतर आता उद्या याबाबत शिवसेनेसोबत चर्चा केली जाणार आहे, त्यानंतर येत्या दोन दिवसांत आघाडीचे नाव घोषीत होऊन सत्तास्थापनेबाबतची घोषणा केली जाईल, असेही आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.