29 September 2020

News Flash

आर्णीत काँग्रेसचा पराभव, मात्र भाजपचाही मतांचा टक्का घसरला

शिवाजीराव मोघे यांच्या पराभवात त्यांच्या निकटवर्तीयांचाच अधिक हात असल्याची चर्चा आता मतदारसंघात आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

जिल्हा परिषद, नगर परिषदेत अभद्र हातमिळवणी काँग्रेसला नडली

यवतमाळ : आर्णी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ उमेदवार अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र २०१४च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली, ही काँग्रेससाठी दिलासाजनकबाब आहे. दुसरीकडे या मतदारसंघात भाजपचा विजय झाला असला तरी मतांची टक्केवारी घसरल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.

आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपने ऐनवेळी आमदार राजू तोडसाम यांची तिकीट कापून डॉ. संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली. तोडसाम यांनी भाजप विरोधात बंड पुकारल्याने तिहेरी लढतीत काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली होती. मात्र येथेच काँग्रेसचा घात झाला. मोघेंची प्रचार यंत्रणा आपणच विजयी होणार या अतिआत्मविश्वासात राहिली. शिवाजीराव मोघे यांचा २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजू तोडसाम यांनी २० हजार ७२१ मतांनी पराभव केला होता. यावेळी शेवटच्या टप्प्यात भाजपचे डॉ. संदीप धुर्वे यांनी आर्णी, घाटंजी, पांढरकवडा भागात यशस्वी खेळी करत मोघेंचा अवघ्या तीन हजार १५३ मतांनी पराभव केला. आर्णी येथे झालेली मुख्यमंत्र्यांची सभा धुर्वे यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. त्यावेळी पांढरकवडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वैशाली नहाटे यांच्यासह प्रहारचे १७ नगरसेवक भाजपात दाखल झाले होते. भाजपसाठी पोषक वातावरण नसताना पांढरकवडा, घाटंजी, आर्णीचे नगराध्यक्ष धुर्वेंसोबत होते, हे विशेष. आर्णी मतदारसंघात ‘मालकशाही’ नको असा जनतेत सूर असतानाही माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार यांच्या सहकार्याने भाजप उमदेवाराला तारले. शिवाजीराव मोघे यांच्या पराभवात त्यांच्या निकटवर्तीयांचाच अधिक हात असल्याची चर्चा आता मतदारसंघात आहे. प्रचार यंत्रणा राबवताना कार्यकर्त्यांवर अविश्वास, नियोजनाचा अभाव या गोष्टी मोघेंना नडल्याचे सांगितले जाते.

आर्णी तालुक्यात काँग्रेसचे तीन जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवाय जिल्हा परिषदेत शिवसेना, भाजपची सत्ता असली तरी अध्यक्षपद मोघेंच्या विश्वासू काँग्रेसच्या माधुरी आडे यांच्याकडे आहे. आडे या स्वत: आर्णी तालुक्यातील आहेत. तरीही काँग्रेसच्या ताब्यातील तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद सर्कलमध्ये केवळ दीड हजार मतांची आघाडी मोघेंना मिळाली. त्यामुळे अध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्यही मोघेंपासून अलिप्त राहिल्याचे बोलले जात आहे. आर्णी नगरपालिकेत शिवसेनेशी युती, पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये भाजपशी अभद्र युती या गोष्टी काँग्रेसला नडल्या. आर्णी नगरपालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बहुमत असताना केवळ राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी मोघे यांच्याशी चर्चा करूनही मोघेंनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने बेग नाराज होते. त्यामुळे मोघेंना आर्णीत राष्ट्रवादी काँग्रेसचीही अपेक्षित मदत मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांना आर्णी विधानसभा मतदारसंघातून सुमारे ५७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी भाजप उमदेवाराला केवळ तीना हजार २००चे मताधिक्य मिळाल्याने ही भाजपसाठीही धोक्याची घंटा समजली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:35 am

Web Title: congress lost in arni but fall in vote percentage share of bjp zws 70
Next Stories
1 यवतमाळ विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मोर्चेबांधणी
2 अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचा लंबक सत्तेकडे
3 मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जोरगेवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले
Just Now!
X