चंद्रपूर : शिवेसना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांच्या हाती काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे एकवटल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंत काँग्रेस नेते व कार्यकर्ते तीव्र नाराज झाले आहेत. त्यातच ज्यांचा काँग्रेसशी संबंध नाही, अशा कोटय़धीशांची नावे विधानसभा उमेदवारीसाठी समोर केली जात असल्याने काँग्रेसच्या गरीब कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायची नाही का, त्यांना उमेदवारी द्यायचीच नाही का? असाही प्रश्न आता निष्ठावंतांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हय़ात आज काँग्रेस खिळखिळी झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर विजयी झाले. १५ वर्षांनंतर काँग्रेसचा खासदार विजयी झाल्याने काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. परंतु काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे ही शिवसेनेतून आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या हाती एकवटली आहेत. या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेसवासी झालेले विनोद दत्तात्रेय व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांची जोड मिळत असल्याने काँग्रेसच्या निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे देवराव भांडेकर, प्रकाश देवतळे तथा नंदू नागरकर यांनी उमेदवारी मागितली आहे. परंतु निष्ठावंतांना डावलून डॉ. विश्वास झाडे या अनोळखी व्यक्तीचे नाव समोर केले जात आहे. विशेष म्हणजे, डॉ. झाडे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तेली समाजाला उमेदवारी दिली नाही म्हणून तेली बांधवांनी काँग्रेसला मतदार करू नये, असे आवाहन केले होते. याच गटाकडून राजुरा विधानसभेत काँग्रेसचे निष्ठावंत माजी आमदार सुभाष धोटे यांचे नाव समोर करण्याऐवजी राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर यांना दिल्लीच्या यादीत महत्त्व देणे सुरू केले आहे. त्यामुळे धोटे गट कमालीचा अस्वस्थ आहे. वडेट्टीवार-धानोरकर या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांमुळे काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया गट तीव्र नाराज आहे. त्यांनी पक्षाकडे ब्रम्हपुरी येथून उमेदवारी मागितली आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनी सुद्धा राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, चिमूर, वरोरा येथे उमेदवारी मागितली आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी ऐनवेळी स्वत:च्या पत्नीचे नाव वरोरा येथून समोर केल्याने डॉ. आसावरी देवतळे, डॉ. विजय देवतळे, डॉ. खापणे, कृउबाचे सभापती दिनेश चोखारे नाराज आहेत. चिमूर येथून माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर व सतीश वारजूकर यांचे नाव समोर केल्या जात असल्याने एक गट नाराज आहे.

चंद्रपुरात विजय या एकाच निकषावर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक चांदा ब्रिगेडचे किशोर जोरगेवार यांचे नाव समोर केल्याने नीलेश खोब्रागडे, संजय रत्नपारखी, महेश मेंढे नाराज आहेत. पक्षात निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांची फौज असताना केवळ आर्थिक निकष बघूनच या सर्वाची नावे समोर केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची नाराजी अधिक बळावली आहे. विशेष म्हणजे, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांकडून निष्ठावंतांना दुखावण्याचे व त्यांची नाराजी ओढवून घेण्याचे काम सुरू आहे.