माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून बऱ्याच चर्चांना ऊत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धुळ्यातील प्रचार सभेत या विधानावरून काँग्रेसवर लक्ष्य केले. त्यानंतर आता भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही काँग्रेस-राष्ट्रवादीला थकलेल्या घोड्यांची उपमा दिली आहे. “काँग्रेस पक्ष काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय, सध्याच्या राजकारणातील ‘थकलेले घोडे’च आहेत. त्यांच्या घोडेस्वारांची मांड घट्ट राहिलेली नाही. निवडणुकीच्या शर्यतीत या दोन्ही घोडय़ांवर ‘जॅकपॉट’ लागत नाही हे 2014 पासून वारंवार सिद्ध झाले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. भविष्यात आम्ही एक होणार,” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते. त्यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “तब्बल दीडशे वर्षांचा वारसा आणि सर्वाधिक काळ सत्तापक्ष म्हणून राहिल्याचा ठसा असलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या नेमकी कशी आहे, या प्रश्नाचे उत्तर आता त्याच पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहे. एक आहेत सलमान खुर्शीद आणि दुसरे आहेत आपले सुशीलकुमार शिंदे. खुर्शीदमियांनी तर महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँगेस पक्ष जिंकणे कठीण आहे असा फटाका मतदानाआधीच फोडला आहे. खुर्शीद काय किंवा सुशीलकुमार काय, दोघेही ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेस पक्षाचे, त्यातही गांधी घराण्याचे निष्ठावंत पाईक आहेत. त्यामुळे त्यांनी मांडलेले मत महत्त्वाचेच ठरते. त्यात चुकीचेही काही नाही. काँग्रेस पक्ष काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय, सध्याच्या राजकारणातील ‘थकलेले घोडे’च आहेत. त्यांच्या घोडेस्वारांची मांड घट्ट राहिलेली नाही. निवडणुकीच्या शर्यतीत या दोन्ही घोडय़ांवर ‘जॅकपॉट’ लागत नाही हे 2014 पासून वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे नावात काँगेस असलेले हे दोन्ही पक्ष थकलेलेच आहेत. काँगेस पक्ष तर एवढा थकला आहे की, राहुल यांनी ‘जॉकी’ म्हणून राहण्याचेही नाकारले आणि पुन्हा एकदा सोनिया गांधींना या ‘थकल्या-भागल्या’ पक्षाचा लगाम हाती घेण्याची वेळ आली,”असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

त्याचबरोबर शिवसेनेनं शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरही टोला लगावला आहे. “पवार म्हणतात, मी थकलेलो नाही. ते ज्या पद्धतीने या वयातही निवडणूक प्रचार करीत आहेत, फिरत आहेत ते पाहता त्यांच्यापुरता हा दावा खरा मानला तरी त्यांचा पक्ष काँग्रेसप्रमाणे थकला-भागलाच आहे. त्यांचे नेते-कार्यकर्ते तेथे राहायला तयार नाहीत आणि त्यांना थोपविण्याची ताकद त्या पक्षात राहिलेली नाही. सुशीलकुमारजी, तुम्ही बोललात ते खरंच आहे. काँगेस पक्ष हा थकलेलाच पक्ष आहे. फरक इतकाच की, ‘सगळं करून भागला आणि नंतर थकला’ अशी त्याची अवस्था आहे. म्हणूनच जनताही त्याला मतांचे टॉनिक द्यायला तयार नाही आणि नेते-कार्यकर्ते या थकल्या पक्षात राहायला तयार नाहीत. काँग्रेस काय किंवा नावात काँगेस असलेला राष्ट्रवादी काय, दोन्ही ‘थकलेल्या पक्षांची कहाणी’ ही अशी आहे. सुशीलकुमार बोलले, शरद पवारांनी सवयीप्रमाणे ते नाकारले, इतकेच,” असा चिमटा शिवसेनेनं पवारांना काढला आहे.