२६३ जागांवर उमेदवार, लहान पक्ष बेदखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्येच आघाडी झाली आहे. काँग्रेस १४६ जागांवर तर राष्ट्रवादी ११७ जागांवर, अशा प्रकारे दोन्ही पक्ष मिळून २६३ जागा लढवीत आहेत. २५ जागा मित्र पक्षांना सोडल्या असल्या तरी, शेकाप, माकप, समाजवादी पक्ष या लहान पक्षांना बेदखल करण्यात आले असून, आठ मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसची या पक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जे पक्ष आघाडीसोबत आहेत, असे सांगितले जाते, त्या शेकाप, समाजवादी व माकप या पक्षाचे व दोन्ही काँग्रेसचे उमेदवार काही मतदारसंघांत आमनेसामने उभे आहेत.

शहापूर, कळवण व नाशिक (प.) या तीन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस व माकपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. कळवणमध्ये माकपचे आमदार जे. पी. गावित यांच्यासाठी ही जागा सोडली नाही. सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात माकपचे ज्येष्ठ नेते कॉ. नरसय्या आडम उभे आहेत. फक्त डहाणूमध्ये माकपच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांनी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सचिव कॉ. अशोक ढवळे यांनी दिली. अन्य तीन ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर मैत्रीपूर्ण लढत होईल, असे त्यांनी सांगितले.

समाजवादी पक्षाने मानखुर्द-शिवाजीनगर, भिवंडी (पूर्व) व औरंगाबाद (पूर्व) या तीन जागांवर समझोता करण्याचे मान्य केले होते. परंतु भिवंडी (पूर्व) मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे. पेण, अलिबाग या मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे शेकाप व काँग्रेस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत ठरलेली आहे. सांगोला मतदारसंघात शेकापला पाठिंबा दिला असताना, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे मैदानात उतरले आहेत. करमाळ्यातील परिस्थिती वेगळीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तेथे संजय पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर संजयमामा शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीने ऐनवेळी संजय पाटील यांना माघार घेण्यास सांगून शिंदे यांना पाठिंबा दिला. परंतु पाटील यांचा अर्ज कायम राहिल्याने, राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. राष्ट्रवादीला अपक्ष उमेदवाराचा प्रचार करावा लागत आहे.