दयानंद लिपारे, कोल्हापूर

गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेतृत्व करणाऱ्या महारथींचा इतिहास सांगणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धवल यश मिळाले. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत करण्याचा महायुतीचा निर्धार दिसतो.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपतींना सोबत घेऊ न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्लय़ात भगवा फडकवण्याची तयारी केली असताना आयारामाच्या प्रभावामुळे युतीच्या निष्ठावंतांना राजकीय भवितव्याची चिंता खाऊ लागली आहे.

महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण असे राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविणारे महारथी पश्चिम महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे राजकारण करीत आले. देशाचे गृहमंत्रिपद भूषविणारे सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून सलग १५ वर्षे सत्तेत असताना महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद असणारे किमान डझनभर मातब्बर याच पंढरीतले. राजकारण, सहकार, शिक्षण संस्था यावरील दोन्ही काँग्रेसनेत्यांचे प्रभुत्व पाहिले की, यांचा सत्तासूर्य कधी मावळणारच नाही असे वाटण्यासारखी परिस्थिती होती; पण भाजपच्या ६-७ वर्षांतील आक्रमक राजकारणाने उभय काँग्रेसच्या अस्तित्वापुढेच प्रश्नचिन्ह लावले.

२०१४ सालची लोकसभा, विधानसभा आणि चार महिन्यांपूर्वीची लोकसभा यामध्ये उत्तरोत्तर दोन्ही काँग्रेसचा सत्तासूर्य मावळू लागला. लोकसभा निवडणुकीच्या अल्याडपल्याड कुंपणावर असलेल्या अनेक सहकारसम्राटांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे महायुतीची ताकद आणखी वाढली.

महायुतीचा वाढता प्रभाव

महायुतीचा वारू वेगाने धावत असताना गेल्या काही महिन्यांत उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, विजयसिंह मोहिते- पाटील अशा प्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अद्यापही काही जण याच वाटेवर आहेत. शिवसेनेचे दिलीप सोपल, रश्मी बागल, दिलीप माने, शेखर गोरे आदींनी शिवबंधन बांधून घेतल्याने सेनेचेही बळही वाढले आहे. बडे सरदार महायुतीच्या छावणीत गेल्याने उभय काँग्रेसला धक्का बसला आहे. महायुतीने काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली आहे.

चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, विजय देशमुख, सुरेश खाडे यांनी पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्याचे नियोजन केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वत: रिंगणात न उतरता पक्षाची या भागातील ताकद वाढवण्याकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी साताऱ्याच्या दोन्ही राजांचा खुबीने वापर करण्याचे ठरवले आहे. जोडीला संभाजीराजे छत्रपती यांना घेऊन मराठा आरक्षणाचा विषय खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोघा देशमुखांनी सोलापूर काबीज करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. खाडे, आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगलीत कमळ फुलवण्याचे प्रयत्न चालवले असताना शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महायुतीचा वाढता प्रभाव पाहता इच्छुकांची संख्या वाढत आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान अर्धा डझन इच्छुक आहेत. वारे अनुकूल असल्याने ‘आता नाही तर कधीच नाही’ असा विचार युतीच्या इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी अटळ आहे.

बंडखोरीची शक्यता : राष्ट्रवादीची दुसरी फळी उभी करून तिला ताकद देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ते ‘कोणी पक्षातून गेले तरी त्याचा निवडणूक निकालावर फरक पडणार नाही,’ असे आत्मविश्वासाने सांगताना दिसत आहेत. निवडणुकीचे वारे वाहत असताना वसंतदादा घराण्यातल्या गटबाजीने डोके वर काढले आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचा हात सोडला. आता त्यांची वंचित बहुजन आघाडीशी जवळीक वाढली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. त्यांची जागांची मागणी आणि स्वत: शिरोळ विधानसभा निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केल्याने गणपतराव पाटील – राजेंद्र पाटील या दोन्ही काँग्रेस इच्छुकांची कोंडी झाल्याने येथे बंडखोरी अटळ आहे.

पवारांवर आघाडीची भिस्त

गेल्या पाच वर्षांत विरोधक म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रभावी कामगिरी करता आली नाही. सततच्या पराभवाने आणि पक्षाला अनेकांनी रामराम ठोकल्याने पक्ष कमकुवत झाल्याचे चित्र आहे. दोन्ही काँग्रेस नेत्यांची सारी मदार आहे ती शरद पवार यांच्यावर. ‘मी अजूनही तरुण आहे,’ असे म्हणत पवार यांनी प्रत्येक जिल्ह्य़ात सभा घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद राष्ट्रवादीला सुखावणारा आहे. शिवाय तो काँग्रेसलाही तारक ठरू शकतो.