News Flash

काँग्रेस-राष्ट्रवादीची आज बैठक; नव्या आघाडीवर निर्णयाची शक्यता

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पाठिंब्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही सावध भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात लवकर सरकार स्थापन होण्याच्या शक्यता धुसरच वाटत आहेत. आता सर्वांच लक्ष आज (बुधवारी) पार पडणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे लागलं आहे.

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक पार पडणार आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यात का उशीर होत आहे, याबाबत ते त्यांना माहिती देणार आहेत. तसंच या बैठकीत शिवसेनेची पुढील रणनितीदेखील ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नव्या आघाडीचं नाव काय असेल? तसंच तीन पक्ष एकत्र आले तर येत्या मुंबई महानगरपालिकेत निवडणुकांची स्थिती कशी असेल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नव्या आघाडीच्या महाशिवआघाडी या नावावर अनुकुल नसल्याची माहिती समोर आली आहे. आम्हाला नव्या आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाचं नाव नकोय. एनडीए आणि युपीएमध्येदेखील कोणत्याही पक्षाचं नाव नाही, असं एका नेत्यानं बोलताना सांगितलं. यापूर्वी ही बैठक मंगळवारी पार पडणार होती. परंतु माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्यानं ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आज पार पडणाऱ्या या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के.सी.वेणुगोपाल आणि राज्यातील काही नेते मंडळी सहभागी होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील सहभागी होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 7:51 am

Web Title: congress ncp leader meeting today discuss on various issues maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 लांबलेल्या पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका
2 व्हॉट्स अ‍ॅपद्वारे व्हिडिओ कॉल; शेळीची यशस्वी प्रसूती
3 सोलापूरची ‘स्मार्ट सिटी नव्हे’ तर ‘स्मार्ट वाट’
Just Now!
X