काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज शिवसेनेशी चर्चा 

नवी दिल्ली / मुंबई :  शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्यावर आघाडीमध्ये सहमती झाली असली तरी सत्तावाटपाचे घोडे अडलेलेच आहे. तिन्ही पक्षांना समान १४ मंत्रिपदे आणि महत्त्वाची खाती वाटून घ्यावीत, असा आग्रह काँग्रेसने धरला तर राष्ट्रवादीने अद्याप पत्ते खुले केलेले नसले तरी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. सत्तावाटपासाठी शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईत शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेशी सहमती झाल्यावरच सरकार स्थापण्याचा दावा करण्यात येईल.

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने अखेर मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत सांगण्यात आले.

सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची लागोपाठ दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. सत्तेचे वाटप कसे करायचे, यावर दोन दिवस प्रदीर्घ चर्चा झाली. किमान समान कार्यक्रमावर सहमती झाली. सत्तेचे वाटप कसे करायचे, हा मात्र कळीचा मुद्दा ठरला. मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचे मंत्रिमंडळ कायद्याने करता येते. शिवसेनेचे ५६ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार असल्याने साहजिकच या दोन्ही पक्षांना जास्त मंत्रिपदे मिळाली पाहिजेत, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मात्र, काँग्रेसला हे सत्तावाटप मान्य नाही. मुख्यमंत्रीपद वगळता उर्वरित ४२ मंत्रिपदांचे प्रत्येकी १४ मंत्रिपदे असे वाटप व्हावे, असा आग्रह काँग्रेसने धरला. तसेच खात्यांचे वाटप कसे करायचे यावर चर्चा झाली. महत्त्वाच्या खात्यांचे तीन पक्षांमध्ये समान वाटप करावे, असे दोन्ही काँग्रेसने मान्य केले. काँग्रेसचा १४ मंत्रिपदांचा दावा राष्ट्रवादीला मान्य नाही. जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपदे हे सूत्र पाळले गेले पाहिजे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. तर उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा काँग्रेसचा आग्रह आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बहुतांशी मुद्दय़ांवर सहमती झाली आहे. शुक्रवारी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा होईल. सायंकाळी शिवसेनेशी चर्चा केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

गृह राष्ट्रवादीला, महसूल काँग्रेसकडे?

खात्यांचे वाटप करताना गृह, महसूल, नगरविकास अशी पहिल्या टप्प्यात विभागणी करण्यात आली. यापैकी गृह राष्ट्रवादीला, नगरविकास शिवसेना तर महसूल काँग्रेसला मिळावे, असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसने तयार केला. याच पद्धतीने सर्व खात्यांचे वाटप व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. दोन्ही काँग्रेसने निश्चित केलेले सूत्र शिवसेनेला सादर केले जाईल.  मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर अद्यापही सहमती झालेली नसली तरी काँग्रेसमधील इच्छुकांनी लगेच दिल्लीत लॉबिंग सुरू केले. आपली वर्णी लागली पाहिजे, अशी जुन्यांबरोबरच यापूर्वी संधी न मिळालेल्यांची मागणी आहे. अनेकांनी खरगे आणि वेणुगोपाल यांची भेट घेतली.