राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी सध्या नवी दिल्लीत ६ जनपथ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे.  शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सायंकाळी साडेपाच  वाजेपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीस दोन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती आहे.

काँग्रेसच्यावतीने  ज्येष्ठ नेते अहमद पटेल, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयराम रमेश, नसीम खान यांची उपस्थिती आहे.  राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा या बैठकीत समावेश नाही. तर राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांची उपस्थिती आहे. या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असून नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्याच्या घडामोडी पाहता महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण,  शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील संमती दिली असल्याची सुत्रांची माहिती आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीसोबत एकत्रित बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची पक्ष मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, प्रदैशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची चर्चा झाली आहे. लवकरच आमचं सरकार येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली. त्या भेटीनंतर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. तसेच, आज सकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेतही राऊत यांनी उद्यापर्यंत सरकार स्थापनेबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे  डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं. सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. राज्यातील राष्ट्रपती शासन दूर करण्यासाठी काही कायदेशीर बाबींमधून जावं लागतं. तसंच राज्यपालांना बहुमताचा आकडा पुरव्यांनीशी द्यावा लागतो. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले होते.