विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकारपरिषदेद्वारे हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची व मित्र पक्षांच्या नेत्यांची देखील  उपस्थिती होती. या जाहीरनाम्यात प्रामुख्याने बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

रयतेचे राज्य आणण्यासाठी १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेत स्वराज्याची स्थापना केली. तीच प्रेरणा घेऊन संयुक्त पुरोगामी महाआघाडीचा हा शपथनामा आज जाहीर करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. संयुक्त पुरोगामी महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली.

यामध्ये प्रामुख्याने बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

याशिवाय शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, सामाजिक न्याय, नागरी विकास, मुंबईचा विकास, ग्रामीण विकास, जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, पाणीपुरवठा – सांडपाणी, ऊर्जा, दळणवळण, युवा, महिला, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, कामगार, रोजगार निर्मिती, अल्पसंख्यांक, पर्यावरण व हवामानातील बदल, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विकास, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विधी न्याय आणि पोलिस दल, वकील या महत्त्वपूर्ण विषयावर जास्त फोकस करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वागिण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही जे करु शकतो ते या शपथनाम्यात आहे. महाराष्ट्रातील जनतेने स्वागत करावे असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

याशिवाय पाच वर्षात राज्याची वित्तीय स्थिती खालावली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १३ टक्क्यावरुन १०.४ टक्क्यावर घसरली आहे. तर गेल्या पाच वर्षांत राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारीची भीषणता इतकी आहे की, ३२ हजार नोकरीसाठी ३२ लाख अर्ज दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या महसुली उत्पन्नात ११ टक्क्यांनी घट झाली आहे तर कर उत्पन्नात ८.२५ टक्क्यांनी घट झाली आहे. आणि २०१६ चा गुन्हेगारीचा अहवाल २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार २०१६ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे ३१ हजार २७५ तर बालकांवरील अत्याचाराचे १३ हजार ५९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असेही यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी जयंत पाटील यांनी सांगितले की, हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्यावतीने एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मोठ्याप्रमाणवर मेहनत घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुनगीकर यांनी देखील यामध्ये विशेष योगदान दिले आहे. आमच्या मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये विशेष सुचना केलेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वात या जाहीरनाम्यासाठी काम करण्यात आलं होतं. हा जाहीरनामा काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांच्या जाहीरनामा समितीने हा बनवला आहे.