राज्यातील सत्ता संघर्षाच्यादृष्टीने आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होत असताना, दुसरीकडे शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र राजभवनात सादर केले आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनात दाखल होत, महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या तिन्ही पक्षांसह सहाकरी पक्षाचे  व अपक्ष आमदार असे मिळून एकूण  १६२आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र जमा केले आहे.

देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, परंतु आज देखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करत आहोत, असे या पत्रात म्हटले आहे. सरकार स्थापन करण्यसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तात्काळ पाचारण करण्यात यावे अशी विनंती देखील पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. या पत्रावर शिवसेना विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत, एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची याप्रसंगी उपस्थिती होती. दुसरीकडे आम्ही देखील बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असे भाजपाकडून देखील सांगितले जात आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची चिन्ह असताना अचानक शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने, राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. याविरोधात महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, याचिका सादर केली. त्यावर काल सुनावणी झाली तसेच आजही सुनावणी होत आहे.