|| नीरज राऊत

काँग्रेस-राष्ट्रवादी-माकपशी हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेसमोर तगडे आव्हान:- पालघर जिल्ह्य़ात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर मित्रपक्षांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी चुरशीच्या लढतींना सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष व नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे विरोधकांनी एकत्रित लढत देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बहुजन विकास आघाडीने वसई, नालासोपारा व बोईसर या तीन ठिकाणी उमेदवारी दाखल केली असून विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी, तर डहाणूमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला जागा देण्यात आली आहे. पालघरच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता उमेदवारी भरणार होता, मात्र शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पालघरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला मिळावी व त्याच्या बदल्यात भिवंडी ग्रामीण जागा काँग्रेस पक्षाला देण्याबाबत उच्च स्तरावर बोलणी सुरू आहेत.

पालघर जिल्ह्य़ातील सहा विधानसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी संपला असून डहाणू, विक्रमगड येथे भाजप तर पालघर, बोईसर, नालासोपारा व वसई येथे शिवसेनेतर्फे उमेदवारी भरण्यात आली आहे. यापैकी अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून यापैकी बंडखोरी किती ठिकाणी होणार हे सोमवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी वाटपामुळे शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून अनेक नाराज इच्छुकांनी उमेदवारी भरली आहे. विक्रमगड येथे भाजपतर्फे सुरेखा थेतले, हरिश्चंद्र भोये व मधुकर खुताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून बोईसर मध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनीदेखील अर्ज भरला आहे. दुसरीकडे भाजपच्या वाटय़ाला गेलेल्या जागांवर शिवसेनेमधील काही कार्यकर्त्यांनी अर्ज भरले असून बंडखोरी करू पाहणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पद्धतीने दबाव टाकण्यात येत आहे.

शिवसेनेचे जिल्ह्य़ात दिलेल्या उमेदवारांपैकी सर्व उमेदवार हे तर इतर पक्षातून आयात केल्याचे दिसून आले आहे. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर शिवसेना प्रवेश केलेल्या त्यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना पालघरची उमेदवारी दिली आहे. बोईसरच्या जागेवर आपला दावा कायम राहावा याकरिता बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आहे. वसईमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी विजय पाटील यांनी गेल्या पंधरवडय़ात शिवसेनेत प्रवेश केला असता त्यांना उमेदवारी दिली असून नालासोपारा येथे भाजपचा दावा मोडीस काढून चकमकफेम प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. असे करताना शिवसेनेने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या निवडणुकीत डावलल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून पक्षाचे सचोटीने काम करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांला यापुढे तिकीट मिळणार का, असा सवाल केला जात आहे.

सेनेत अंतर्गत नाराजीचे वातावरण क्षमविण्याचा प्रयत्न आमदार रवींद्र फाटक करीत असून त्यांनी भेटीगाठी घेत आहेत. नाराज असलेले इच्छुक कार्यकर्त्यांच्या भेटेगाठीही सुरू आहेत. तर काही इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर करण्याची तयारी दाखवली असता त्यांना पक्षप्रमुखांची भेट घालून देऊन आगामी काळात विधान परिषदेत किंवा वेगवेगळ्या समित्यांमध्ये सामावून घेतले जाण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. असे असले तरी या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वेळी उफाळून येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

वडिलांच्या निधनानंतर मिळालेल्या तीन वर्षे कार्यकाळात मी सचोटीने काम केले. मात्र शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेला शब्द पूर्ण करायचा असल्याने, या आश्वासन पूर्ती मध्ये बळी घेतला आहे. जनतेची सेवा करायची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत आहे. -अमित घोडा, आमदार, पालघर

 

पालघर जिल्हा बालेकिल्ला म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेच्या वाटेला आलेल्या चारही मतदारसंघात त्यांच्या पक्षातील कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळू शकला नाही, ही शोकांतिका आहे. ‘बविआ’ला संपवण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेनेने स्वत:ला संपवून घेऊ  नये.-हितेंद्र ठाकूर, आमदार, बविआ