विधानसभा निवडणूकीच्या निकालापूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादीत आरोपप्रत्यारोप सुरू झाले असल्याचे दिसत आहे. सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर समोर आलेल्या विविध एग्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा भाजपा-शिवसेना महायुती सत्तेत येणार असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले जात असल्याचे दिसत आहे. मात्र, एकीकडे जरी असे असले तरी दोन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांकडून यंदाच्या निवडणूकीत  विजयाची खात्री असल्याचेच बोलले जात आहे.

काँग्रेसचे नेते प्रदेश सचिव राजन भोसले यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असताना शत्रूची गरज नाही, असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद वगळता, राष्ट्रवादीचा कोणता नेता राज्यभर महाआघाडीच्या प्रचारासाठी फिरला, असा सवालही त्यांनी केला आहे. प्रकृती चांगली नसतानाही ८० वर्षांच्या शरद पवार यांनी राज्यभर फिरून प्रचार सभा घ्याव्या लागल्या असल्याचेही ते म्हणाले.

या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य माजिद मेमन यांनी, आमच्यात दुर्देवाने काँग्रेसचे प्रदर्शन चांगले राहिले नाही. त्यामुळे काँग्रेस कदाचित कुठेतरी कमकुवत पडत आहे. प्रचारासाठी सोनिया गांधी, प्रियंका गांधी आल्याच नाहीत. राहुल गांधी आले तर त्यांच्या सभेत काँग्रेसचे नेते गैरहजर होते. यामुळे थोडा चुकीचा संदेश गेला आहे. केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचार कालावधीत कठोर मेहनत घेतली. एक्झिट पोलचे अंदाज पाहता जनतेने आमच्या बाजूने कौल दिलेला नाही, असे प्राथमिक चित्र दिसते. तथापि काँग्रेसशी आघाडी करणे हा आमचा नाईलाज होता. ‘कारण पक्ष एकटा निवडणुकीला सामोरा जाण्याच्या स्थितीत नव्हता, असे म्हटले होते.