अनुच्छेद ३७० हटविल्याने शांतता नांदण्याची चिन्हे निर्माण झाली असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्ये आणि एकूण भूमिका बघता शेजारच्या देशाशी त्यांचे लागेबांधे असल्याचा संशय येतो, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचार सभेत केला. हिंमत असेल तर विरोधकांनी त्यांच्या जाहीरनाम्यात कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

रविवारी येथे पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. कसे काय जळगावकर, मी बघतोय संपूर्ण महाराष्ट्र महाजनादेश यात्रेसाठी सज्ज झाला आहे. तुम्हीपण देणार ना महाजनादेश, अशी मराठीतून भाषणास सुरुवात करणाऱ्या पंतप्रधानांनी नंतर विरोधकांना लक्ष्य केले.  जम्मू-काश्मीर केवळ तुकडा नाही, ते भारताचे मस्तक आहे. तिथे ४० वर्षांपासून असामान्य स्थिती होती. ती सामान्य करण्यास चार महिनेही लागणार नाहीत. परंतु, देशातील राजकीय विरोधक त्याचे राजकारण करीत आहेत, अशी टीका पंतप्रधानांनी केली. शरद पवार अद्याप प्रसिद्धीसाठी धडपड करतात. एखादा नेता पुढे जाऊ नये, अशी शरद पवारांची नीती असल्याचेही मोदी यांनी नमूद केले. आगामी काळात जळगाव जिल्ह्य़ास औद्योगिक, सिंचन तसेच कृषीविषयक विकासात पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

एकनाथ खडसे यांची अनुपस्थिती

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव येथील सभेस अनुपस्थित होते. बंधू के. जी. खडसे यांच्या निधनामुळे एकनाथ खडसे उपस्थित राहिले नाहीत. त्यांची कन्या मुक्ताईनगरच्या उमेदवार रोहिणी खडसे आणि सून खासदार रक्षा खडसे या उपस्थित होत्या.