20 October 2019

News Flash

आघाडीचं जागावाटप ठरलं! मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा नाही-बाळासाहेब थोरात

मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावर चर्चा झाली नसल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे

संग्रहित

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ तर मित्र पक्षांना ३८ जागा देणार असल्याचा फॉर्म्युला नक्की झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी मनसेला सोबत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मनसे आता काय करणार हा प्रश्न कायम आहे. विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपा यांनी युती जाहीर केली आहे. मात्र कोण किती जागांवर लढणार? मित्र पक्षांना किती जागा सोडणार ते स्पष्ट झालेलं नाही. अशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागावाटप ठरलं असल्याची माहिती नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत दिली. तसंच येत्या आठवड्यात निवडणूक कधी होणार त्याची तारीख जाहीर होईल असंही त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात प्रचार केला होता. मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. आता विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही हेदेखील स्पष्ट झालेलं नाही. अशात मनसेला सोबत घ्यायचं की नाही याबाबत काहीही चर्चा झालेली नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

 

 

 

First Published on September 16, 2019 3:11 pm

Web Title: congress ncps seat formula for assembly election is decided no discussion regarding mns says balasaheb thorat scj 81